गोव्याच्या सागरी हद्दीत कोलवा, बाणावलीत बेकायदेशीरपणे मासेमारी प्रकरणी कारवाई
छीमारी खात्याने काल दक्षिण गोव्यातील कोलवा आणि बाणावली किनाऱ्याजवळ गोव्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररित्या मासेमारी करणारे कर्नाटक राज्यातील तब्बल 15 ट्रॉलर्स जप्त केले. या मोहिमेसाठी मत्स्योद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छिमार तसेच किनारपट्टी पोलिसांची मदत घेतल्याची माहिती मत्स्योद्योग खात्याच्या संचालक शमिला मोंतेरो यांनी दिली. जप्त केलेले सर्व ट्रॉलर्स पणजी जेटीवर आणले जाणार असून, ट्रॉलर्सवरील मासळीचा पणजी जेटीवर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्नाटकातील सुमारे 10 ते 15 ट्रॉलर्स एकाच वेळी कोलवा किनाऱ्याजवळ येऊन गोव्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्योद्योग खात्याने तातडीने पावले उचलून हे ट्रॉलर्स जप्त केले. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्यात आली. दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध मच्छिमार ‘पेले’ यांनी पुढाकार घेऊन स्थानिक मच्छिमारांना जमवले. त्यांच्या मदतीने कर्नाटकचे पाच ट्रॉलर्स जप्त करण्यात आले. त्यापैकी तीन पणजी जेटीवर आणण्यात आले. एक कुटबण जेटीवर नेण्यात आला, तर एक दक्षिण गोव्यात अन्य ठिकाणी नांगरून ठेवण्यात आल्याची माहिती मोंतेरो यांनी दिली. उर्वरित 10 ट्रॉलर्स हे किनारपट्टी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हे 15 ट्रॉलर्स ताब्यात घेण्यासाठी मच्छिमारांच्या बोटी, मत्स्योद्योग खात्याच्या गस्तीवरील बोटी व किनारपट्टी पोलिसांच्या बोटींची मदत घेण्यात आली. परराज्यातून गोव्यात येऊन किनारी हद्दीचा भंग करीत गोव्यातील समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारे एवढे ट्रॉलर्स पहिल्यांदाच जप्त करण्यात आल्याचे मोंतेरो यांनी स्पष्ट केले.
मासळीच्या पाच पट दंड ठोठावणार
देशाच्या सागरी कायद्यानुसार अन्य राज्यांच्या सागरी हद्दीत जाऊन मासेमारी करण्यावर बंदी आहे. ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव केल्यानंतर प्रत्येक ट्रॉलरवरील मासळीच्या लिलावातून जेवढे पैसे मिळतील, त्या रकमेच्या पाचपट दंड प्रत्येक ट्रॉलर मालकाला ठोठावण्याची कायद्यात तरतूद असल्याचे मोंतेरो यांनी स्पष्ट केले.