पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झाले. पहलगामच्या लीडर नदीतून ह्या एका वर्षात बरेच पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण देशामध्ये संतापाचा लाव्हा उसळवणाऱ्या बैसरानमधील त्या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या तिघा दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत कंठस्नान घातले. लष्कर ए तय्यबाशी संबंधित ज्या द रेसिस्टन्स फोर्सने हा दहशतवादी हल्ला घडवला, तिला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यातही भारताने यश मिळवले. तिच्या पाठीराख्या असलेल्या लष्कर ए तय्यबा, जैश ए महंमद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन ह्या तिन्ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांना ‘ऑपरेशन सिंदूर’ खाली उद्ध्वस्त करून आणि त्यांना पदराखाली घेणाऱ्या पाकिस्तानलाही आजन्म लक्षात राहील असा धडा शिकवून भारताने आपली संरक्षणनीती यापुढे केवळ बचावात्मक राहणार नाही हे ‘न्यू नॉर्मल’ घालून दिले. पाकिस्तानचे नाक दाबण्यासाठी सिंधू पाणीवाटप करार संस्थगित केला गेला. या कराराखालील भारताच्या वाट्याच्या नद्यांचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी धरणे बांधून रोखण्याची तयारीही सरकारने चालवली आहे. पाकिस्तानशी ताणले गेलेले संबंध अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत आणि येण्याची शक्यताही नजीकच्या काळात दिसत नाही. मात्र, एवढे सगळे होऊनही पाकिस्तानात मुळे असलेला दहशतवाद संपुष्टात आलेला नाही वा त्यांच्या भारतातील कारवायाही संपलेल्या नाहीत. पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवेळीच दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याचे एक मोठे कारस्थान नुकतेच उजेडात आले. त्याआधीही हेरगिरीपासून दहशतवादी कारवायांपर्यंतचे अनेक बेत वेळीच सुरक्षा यंत्रणांना सुगावा लागल्याने उधळले गेले. म्हणजेच दहशतवाद अनेक प्रकारे अधूनमधून आपले दार ठोठावतच राहिला आहे. पहलगाम हल्ल्याचा कट ज्याने रचला तो हाफिज सईद किंवा जैश ए महंमदचा मौलाना मसुद अजहर हे अजूनही पाकिस्तानात सुखरूप आहेत. त्यांच्या नातलगांना कंठस्नान घातले गेले तरी हे सैतान वाचले आहेत आणि भारताविरुद्ध कटकारस्थाने आखत बसले आहेत. जम्मू काश्मीर सध्या शांत असले, तरी येणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एखादी मोठी घातपाती कारवाई होण्याची शक्यताही वाढली आहे. म्हणजेच अजूनही देश दहशतीच्या सावटाखालीच आहे. नक्षलवादाचा ज्या निर्धाराने खात्मा केला गेला, त्याच प्रकारे दहशतवादाविरुद्धचा लढा लढला जातो आहे ही आश्वासक बाब जरूर आहे, परंतु स्थानिक पाठिंब्यानिशी अधूनमधून त्याची नवनवी रूपे प्रकटत असतात ही चिंतेची बाब आहे. पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दहशतवादापुढे झुकणार नाही अशी ग्वाही पुनश्च दिली आहे. ऑपरेशन सिंदूर कारवाई भारताने वेळीच आवरती घेतली. उद्दिष्टपूर्ती झाल्याने ती मोहीम मागे घेतली गेल्याचे सरकारने तेव्हा सांगितले तेव्हा अमेरिकेच्या दबावाखाली ती मोहीम मागे घेतली गेल्याची टीका झाली होती. परंतु आज इराण – अमेरिका दरम्यानचे युद्ध कशा प्रकारे लांबत चालले आहे आणि ते थांबवणे दोन्ही बाजूंसाठी कसे कठीण बनले आहे हे पाहिले तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम थांबवण्याचा निर्णय किती दूरदर्शीपणाचा होता हे लक्षात येते. अर्थात ती मोहीम आवरती घेताना भारत सरकारने ती पूर्ण झालेली नाही, तर स्थगित ठेवलेली आहे हा इशारा तेव्हाच देऊन ठेवला आहे. आपण जर भारताची कुरापत काढली, तर ‘ऑपरेशन सिंदूर’ ची पुनरावृत्ती होऊ शकते हे पाकिस्तानला नक्कीच आहे. सध्याच्या इराण – अमेरिका संघर्षात पाकिस्तान अमेरिकेशी पुन्हा घसट करू लागला आहे हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. भारत – पाकिस्तानदरम्यान खुट्ट जरी झाले तरी डोनाल्ड ट्रम्प नावाचा लहरी राष्ट्रप्रमुख त्यात नाक खुपसल्याविना राहणार नाही. परंतु पाकिस्तानात बसून भारतामध्ये हाहाकार माजविण्याची स्वप्ने पाहणारे सैतान तेथे अजूनही सुखाने नांदत आहेत हे विसरून कसे चालेल? दहशतवादी संघटनांची मुख्यालये भले उद्ध्वस्त झाली, परंतु जागा बदलून पुन्हा प्रशिक्षणे आणि भारतविरोधी कटकारस्थाने सुरू झाली आहेत. संधी मिळेल तेव्हा भारतात हलकल्लोळ माजविण्याचे दुष्ट मनसुबे रचले जात आहेत. काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असली, तरी अजूनही पूर्वपदावर गेलेली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्यालाही अनेक धडे दिले आहेत. भारताच्या संरक्षणनीतीमध्ये अनेकपदरी परिवर्तन गेल्या वर्षभरात घडले आहे. आपण अधिक सावध, अधिक सुसज्ज झालो आहोत. त्याच्या आधारे कितीही मोठ्या आव्हानाला यापुढे आपण समर्थपणे तोंड देऊ शकू अशी अपेक्षा बाळगूया!