सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणात अटक केलेल्या मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर याची गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने कसून चौकशी सुरू केली आहे. वास्को येथे 18 एप्रिल 2026 रोजी एका कार्यक्रमात बोलताना गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने खळबळ माजली होती. गोवा पोलिसांनी हिमाचल पोलिसांच्या सहकार्याने गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेशातील कूल्लू येथे ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. त्याला रविवारी गोव्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा अन्वेषणकडून खट्टर याची आक्षेपार्ह विधानाबाबत सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात सहआरोपी म्हणून अटक केलेल्या माधव खट्टर याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत काल रवानगी करण्यात आली. त्याचा पोलीस कोठडीतील चार दिवसांचा रिमांड पूर्ण झाल्यानंतर त्याला वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायालयात काल हजर केले होते.