Home बातम्या 7 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणास मंजुरी

7 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणास मंजुरी

0

आपची सदस्यसंख्या 3 वर, तर भाजपचे 113 खासदार

राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) सात बंडखोर खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणाला मंजुरी दिली. या निर्णयानंतर राज्यसभेत आपची सदस्यसंख्या घटून 3 झाली आहे, तर भाजप खासदारांची संख्या 106 वरून वाढून 113 झाली आहे.
भाजपमध्ये सामील झालेल्या सात खासदारांमध्ये राघव चढ्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या अधिकृत वेबसाईटवरही या खासदारांना भाजपचे सदस्य म्हणून दाखवण्यात आले.

आपने रविवारी सभापतींकडे सातही खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. संजय सिंह यांनीही पत्र लिहून त्यांना पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवत अपात्र घोषित करण्याची विनंती केली होती.
संजय सिंह यांच्या मते, आपने वकील कपिल सिब्बल आणि लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांच्यासह अनेक घटनात्मक तज्ञांचा सल्ला घेतला आहे. संविधानाच्या 10 व्या अनुसूचीनुसार सर्वात आधी पक्षाला प्रस्ताव मंजूर करून दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. कोणताही खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही.

आपच्या 10 राज्यसभा खासदारांपैकी राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून भरकटल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज्यसभेतील सात खासदार कमी झाल्यामुळे आपला मोठा झटका बसला आहे, तर नव्याने सात खासदार पक्षात दाखल झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे.