बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टीवर आज 7 रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढच्या सहा सात दिवसांत पश्चिम किनारी प्रदेश, वायव्य आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम राहील. तसेच गुजरातपासून दक्षिण कर्नाटकापर्यंत किनाऱ्याला समांतर दाट ढग जमले आहेत. त्यामुळे कोकण आणि घाटातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता आहे. आज 7 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कोकणातील बाकीचे जिल्हे, या ठिकाणी पुढच्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. देशभरातही अगदी दक्षिणेकडेचा भाग आणि इशान्येकडील राज्ये वगळता बहुतांश ठिकाणी सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.