गोव्यातील २५० कि. मी. अंतराचा महामार्ग कॉंक्रिटचा होणार

0
109

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकल्पास तत्वत: मान्यता
मुंबई ते कोंकण महामार्गाच्या कॉंक्रिटायजेशन प्रकल्पात गोव्यातील जुवारी पुलासह २५२ कि. मी.च्या महामार्गाचाही या प्रकल्पात समावेश करून विकास करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी काल दिली.केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर आपण व येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी गडकरी यांची भेट घेवून वरील प्रस्ताव सादर केला. या बैठकीस महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते, महामार्गाचे अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अभियंत्यांना हा प्रस्ताव पुढे नेण्यास सांगितले असून पंधरा दिवसात सर्व सोपस्कार पूर्ण केलेला प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. सीआरएफ योजनेखाली राज्यातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी शंभर कोटीं रुपयांची मागणी केल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. महामार्गाच्या प्रकल्पामुळे गोव्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. महामार्गाचा प्रकल्प दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याची आहे. येथील जुवारी नदीवरील पूल कमकुवत बनल्याचे समांतर पूल उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गडकरी यांच्या सहकार्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा ढवळीकर यांनी व्यक्त केली.