लखनवीला जामीन : भारताकडून संतप्त प्रतिक्रिया

0
91

२६/११ मुंबई हल्ला प्रकरण : निवाडा फिरविण्याची मागणी
२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार असलेल्या लष्करे तैयबाचा म्होरक्या झकिऊर रेहमान लखनवी याला पाकिस्तानी न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने संतप्त झालेल्या भारतीय प्रशासनाने हा निर्णय आपल्याला मान्य नसून तो तातडीने फिरविण्यात यावा अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे. दरम्यान या निवाड्याबाबत भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. ‘अत्यंत दुर्दैवी’ अशा शब्दात त्यांनी या निवाड्याचे वर्णन केले.रावळपिंडी येथील न्यायालयाने काल लखनवी याला काल जामीन मंजुरीचा निवाडा दिल्यानंतर भारताने आपल्या भावना रोखठोकपणे पाकिस्तानला कळविल्या आहेत. दहशतवादा संबंधात निवडक भूमिका घेणे चुकीचे असून दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही ही बाब पाकिस्तानने समजून घ्यायला हवी याकडे भारताने लक्ष वेधले आहे. तर राजनाथ सिंग यांनी पाकिस्तान या निवाड्याला आव्हान देईल अशी आशा व्यक्त केली. ‘‘मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आणि त्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ज्या व्यक्तीला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविले त्याला जामीन मंजूर होतोय हे न पटणारे आहे’’. अशी प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.
पेशावरमधील शाळेवर हल्ला करून शेकडो निष्पाप मुलांचे बळी घेऊन दोनच दिवसांनी वरील निवाडा झाल्याने अशी निर्घृण कृत्ये करणार्‍या अतिरेक्यांना पुन्हा उत्तेजन मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले. दोनच दिवसांपूर्वी स्वत:च्याच वाट्याला आलेल्या दु:खापासून पाकिस्तानने धडा घ्यावा असे ते म्हणाले.
लखनवी आणि अन्य सहा जणांनी दहशतवादविरोधी न्यायालयात बुधवारी जामीनासाठी अर्ज केला होता. यावेळी पेशावरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ तेथील वकील संपावर होते हे विशेष. लखनवी, अब्दुल वाजिद, मझहद इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमील रियाज, जमील अहमद व युनुस अंजूम हे आरोपी सध्या रावळपिंडीतील तुरुंगात आहेत.
लखनवीप्रकरणात त्याच्याविरोधात पुरेसा पुरावा नसल्याचा पाक सरकारचा दावा आहे, याकडे लक्ष वेधले असता यासंदर्भातील ९९ टक्के पुरावे पाकिस्तानात असल्याने ते न्यायालयासमोर सादर करण्याची जबाबदारी पाक सरकारची असल्याचे अकबरुद्दिन म्हणाले.