वास्कोतील दुकानाला लागलेल्या आगीत ८ लाखांचा माल खाक

0
87
आगीच्या भक्षस्थानी सापडलेले दुकानातील सामान. (छाया : प्रदीप नाईक)

नवेवाडे-वास्को येथे हार्डवेअर दुकानाला काल पहाटे आग लागून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुकानातील बहुतेक माल जळून खाक झाला. पहाटे ४.३० वा. शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याचे उघड झाले आहे.काल पहाटे पाच वाजता फिरण्यासाठी जात असलेल्या एका इसमाच्या नजरेस श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता देवळाजवळ असलेल्या एका दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. जवळ असलेल्या प्रताप शेट या दुकानदाराला कळविले असता त्यांनी अग्निशामक दलाला फोन केला. घटनेची माहिती मिळताक्षणी अग्नीशामक दलाचे जवान बंब घेऊन पाच मिनिटांत दाखल झाले व आग विझवण्यास सुरुवात केली. यावेळी एका जवानाला आग विझवीत असताना शॉक लागला. पण प्रसंगावधान राखून तो बाजूला सरकला व वीज खात्यास याबाबत कळविले असता तातडीने वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी येऊन सदर दुकानाचे शटर तोडून आतील कनेक्शन तोडून टाकले. परंतु तोपर्यंत आग फैलावत चालली होती. फायर फाईटर जेरोनीमो डिमेलो, डायव्हर ऑपरेटर पी. जी. नाईक, फायर फाईटर डी. जी. तुयेकर, पी. जी. कवळेकर, राघोबा मांजरेकर यांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली व सुमारे ७० लाखाचा माल वाचविण्यात यश मिळविले. तसेच या दुकानाच्या बाजूला आणखी दोन दुकाने सदर आगीपासून आग वेळीच आटोक्यात आणल्याने वाचली. या आगीत आठ लाखाचे सामान नष्ट झाल्याचे सांगितले.
दुकानाची मुख्य कागदपत्रे तसेच दस्ताऐवज आगीत जळून खाक झाल्याचे मालक श्री. जैन यांनी सांगितले. हवालदार यू. व्ही. कळंगुटकर यांनी येऊन पंचनामा केला. नगरसेविका तारा केरकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन विचारपूस केली.