गोव्यातही खेला होबे!

0
48

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवले आहे. त्यांनी आपले दोन दूत – राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन आणि लोकसभेचे खासदार प्रसून बॅनर्जी यांना गोव्याकडे रवानाही केले आणि लवकरच त्या स्वतःच गोव्याच्या सुपिक मातीमध्ये आपल्या पक्षाचे रोप लावण्यासाठी उतरणार आहेत.
तसे पाहता तृणमूल कॉंग्रेस काही यंदा पहिल्यांदा गोव्यात अवतरत नाही. जेव्हा जेव्हा येथील नेत्यांना आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आहे असे वाटले, तेव्हा त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी अशाच प्रकारे २०१२ च्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसच्या निशाणीवर वीस उमेदवार राज्यात उतरवले होते. त्यातील एकोणीस जणांची अनामत जप्त झाली हा भाग वेगळा. पक्षाला राज्यभरामध्ये मिळून जेमतेम १.८३ टक्के म्हणजे १५,३२३ मते मिळाली, परंतु तीही बहुतेक उमेदवारांची वैयक्तिक मते होती. नंतरच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून लढण्यासाठी चर्चिल आलेमाव यांनीही तृणमूल कॉंग्रेसचा आधार घेतला, परंतु भाजपच्या नरेंद्र सावईकरांंनी त्यांना तेव्हा धूळ चारली. तृणमूल कॉंग्रेसचे संघटनात्मक कार्य तेव्हाही गोव्यात नव्हते आणि आजही नाही, परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आलेल्या नेत्यांना काडीचा आधार देण्यासाठी ममतांचा हा पक्ष आज गोव्यात शेवटच्या क्षणी अवतरलेला आहे. उमेदवारांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवायची आहे, परंतु अपक्ष म्हणून रिंगणात राहण्यापेक्षा एखाद्या पक्षाचे निवडणूक चिन्ह घेऊन राहिले म्हणजे त्याला एक प्रतिष्ठा येते, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीवर उतरलेल्या मंडळींना तृणमूलसारख्या गोव्यात कोणतेही लोढणे नसलेल्या पक्षाच्या उमेदवारीवर लढणे सोईचे ठरू शकते. ममता बॅनर्जींनी एकाएकी गोव्याकडे लक्ष का वळवले म्हणून बुचकळ्यात पडलेल्यांना त्यांच्या राष्ट्रीय स्वप्नाची कल्पना नसावी. पश्‍चिम बंगालचा गड राखल्यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर ममतांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून स्वतःच्या नावाला सर्वसहमती मिळवण्याच्या दिशेने त्यांची सुनियोजित पावले पडत आहेत. त्यातूनच त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये विरोधी पक्षांच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आपल्याविरुद्ध आकाशपाताळ एक करणार्‍या भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याचा विडाही त्यांनी उचललेला आहे. त्यामुळे जेथे जेथे भाजपची सरकारे आहेत, तेथे तेथे जाऊन भाजपाच्या घोडदौडीला आडकाठी करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेश, गोवा, त्रिपुरा आणि आसाममध्ये ‘खेला होबे’ (खेळ सुरू होणार) चा नारा ममतांनी दिला आहे. गोवा हे तर अगदी छोटे राज्य. त्यामुळे येथे कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधून भाजपाला धडा शिकवण्याचा प्रयत्न त्या आणि त्यांचे दूत करणार आहेत असे दिसते.
तृणमूल कॉंग्रेसचे गोव्यात येणे आणि त्याच मुहूर्तावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरोंचे आणि त्यांच्या समर्थकांचे रुसवे फुगवे सुरू होणे ह्यालाही काही विशेष अर्थ आहे. लुईझिन यांनी कॉंग्रेसचे सरकार यदाकदाचित आले तर मुख्यमंत्रिपदावर आपली वर्णी लागावी यादृष्टीने वातावरणनिर्मितीस सध्या प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना महत्त्व दिले जाणार नसेल तर ते वेगळा मार्ग चोखाळू शकतात असे सूचित करायला त्यांचे पक्षातील चेले सध्या पुढे आलेले दिसतात. तृणमूल कॉंग्रेसचे गोव्यामध्ये काहीही संघटन नाही हे उघड आहे. पण केवळ निवडणुकीपुरता हा पक्ष अवतरणार आहे आणि काही बंडखोर नेत्यांची सोय लावून देणार आहे एवढाच त्याच्या येण्याचा मथितार्थ नाही. भाजपला धडा शिकवण्यासाठी विरोधकांची एकजूट बांधण्याचा प्रयत्नही ममता गोव्यात करतील, त्यामुळेच ह्या राजकीय घडामोडीची गांभीर्याने दखल घेणे जरूरी आहे. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र लढण्यास कॉंग्रेस तयार नाही. अशा वेळी ममता – केजरीवाल एकत्र येऊन समझोता करून गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करू शकतात आणि उमेदवारी धोक्यात आलेली मंडळी तिच्या आसर्‍याला जाऊ शकते. प्रशांत किशोर यांच्यासारखे निष्णात निवडणूक नीतीज्ञ त्यांच्या साथीला आहेत हे विसरले जाऊ नये!