कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

0
34

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही सक्रिय झाली असून, अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल या तीन पक्षांच्या युतीसाठी प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रवादी आणि तृणमूल या पक्षांचा जन्म कॉंग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांमुळेच झालेला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी या निवडणुकीत युती करून निवडणूक लढवावी, असा एक विचारही आता पुढे येऊ लागलेला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.

गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस समितीने नुकतीच मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, संजय बर्डे, प्रितम नाईक आदी नेते उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीची रणनीती काय असावी, कोणत्या पक्षाबरोबर युती केल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल, यावर बैठकीत चर्चा झाली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांची युती झाल्यास वेगळी समीकरणे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या पक्षांची युती होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शरद पवार, प्रफुल्ल पटेल लवकरच गोव्यात
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे लवकरच गोव्यात दाखल होणार असून, ते स्थानिक नेते व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहेत.