गोव्याचे नीरो

0
196

गोव्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहिली तर गोवा पुन्हा एकवार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट दिसते. कोरोनाची पहिली लाट राज्यात आली ती या विषाणूसंबंधीच्या अज्ञानातून आलेली होती. यावेळी जी दुसरी लाट येणार आहे ती मात्र जनतेच्या आणि त्याहूनही अधिक राज्य सरकारच्या बेफिकिरीतून येणार आहे!
सरकारचे तथाकथित कोरोना व्यवस्थापन सध्या ज्या प्रकारे चालले आहे ते पाहिल्यास गेल्या वर्षभराच्या अनुभवातून आपण काही शिकलोच नाही का हा प्रश्न पडतो. राज्यात कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन केले जाणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्त आहे, परंतु किमान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांची कार्यवाही तरी गांभीर्याने करणार आहात की नाही? पर्यटनाला बाधा येऊ नये म्हणून – म्हणजे खरे तर राज्यातील हॉटेल व टॅक्सी व्यावसायिकांच्या दबावापोटी – सरकारने सध्या पर्यटकांची जी बेबंदशाही चालू दिली आहे, ती राज्याला पुन्हा एकदा गंभीर संकटाकडे घेऊन चालली आहे.
गेल्या काही दिवसांतील राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहिली तर आता हे लोण सर्व प्रमुख शहरांत तर पसरले आहेच, परंतु ते आता खेड्यांकडेही अपरिहार्यपणे चाललेले दिसते. राज्यातील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या गेल्या काही दिवसांत बघता बघता दीड हजाराच्या वर जाऊन पोहोचली आहे. दिवसागणिक शंभरहून अधिक नवे रुग्ण सातत्याने आढळत आहेत. काल तर दोनशे रुग्ण एका २४ तासांत सापडले. मृत्यूदरातही चिंताजनक वाढ दिसून आली आहे. सध्या मडगावात १७३, पणजीत १६५, पर्वरीत १३०, फोंड्यात १२१, वास्कोत १०८ असे कोरोना रुग्णांचे अधिकृत सरकारी आकडे आहेत, तेही दिवसागणिक जेमतेम दीड हजार चाचण्या होताना. कांदोळीत ११४, तर पर्वरीत १३० रुग्ण आहेत. कोरोना पुन्हा गोव्याला विळखा घालत असल्याचे स्पष्ट दिसत असूनही सरकार मात्र कमालीचे बेफिकिर दिसते.
जनतेकडून टीकेची झोड उठल्याने राज्याच्या दोन्ही जिल्ह्यांत १४४ कलम लागू करण्याची दिखाऊ उपाययोजना केली गेली, परंतु आता हे कलम पारंपरिक शिमगोत्सवाला वा पर्यटनक्षेत्राला लागू नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मग हा जमावबंदीचा देखावा आहे कशासाठी? सरकारने आपल्याच निर्णयांबाबत पुन्हा एकवार हे जे काही तळ्यात – मळ्यात चालवले आहे ते घातक आहे. एकीकडे सरकार जमावबंदी असल्याचे सांगते आणि दुसरीकडे ‘हुनरहाट’ सारखे गर्दी खेचणारे लोकोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते, कॅसिनो आणि पार्ट्यांना मुक्तद्वार देते याचा अर्थ काय? काही दिवसांपूर्वी एका कॅसिनोवरील तब्बल पस्तीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. परंतु सरकारने इतर कॅसिनो वा हॉटेलांमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तीळभरही पाऊल टाकल्याचे दिसले नाही. कॅसिनो सुरू आहेत, किनारपट्टीवरील पार्ट्या सुरू आहेत. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या शेजारच्या महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने पर्यटक रोज गोव्यात उतरत आहेत. परंतु त्यांच्या संख्येवर मर्यादा घालणे तर सोडाच, अधिकाधिक संख्येने ते यावेत आणि बेबंदपणे वावरावेत यासाठी जणू सरकारच प्रोत्साहन देते आहे, कारण ह्या सरकारमधील काही मंत्र्यांचे व्यावसायिक हितसंबंध पर्यटनक्षेत्रात गुंतलेले आहेत.
मुळात राज्यातील नेतेमंडळीच कोरोनाबाबत गंभीर नाही. स्वतःच मास्क न घालता सर्व नेते बेजबाबदारपणे हिंडत आहेत, सामाजिक अंतर न पाळता, विनामास्क छायाचित्रांत झळकत आहेत. बहुतेकांना कोरोनाचा प्रसाद यापूर्वीच मिळाला आहे, परंतु त्यातून बरे झाल्याने आत्मविश्वास दुणावलेला दिसतो. पण हा अत्यंत घातक विषाणू आहे आणि एकदा बचावलात याचा अर्थ दुसर्‍यावेळीही यातून सुखरूप बाहेर येऊ असे वाटत असेल तर हा निव्वळ भ्रम आहे. नुकतेच एक आमदार कोरोनाबाधित झाले. वास्तविक कुटुंबातील व्यक्ती कोरोनाग्रस्त झाली तर इतरांनी विलगीकरणाखाली राहायचे असते. परंतु त्यांचे पुत्र घराबाहेर पडले आणि महापौरही बनले हे कसे काय?
वास्तविक केंद्रातील मोदी सरकार विविध राज्य सरकारांना कोरोनासंदर्भात गांभीर्याने उपाययोजना करण्यास वारंवार आणि परोपरीने सांगते आहे. परंतु गोव्याने हे दिशानिर्देश गांभीर्याने घेतल्याचे दिसलेले नाही. वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर काय घडू शकते हे शेजारच्या महाराष्ट्रात दिसू लागले आहे. महाराष्ट्रासारख्या विशाल राज्यामध्ये कोरोनावर नियंत्रण ठेवणे ही खरोखर अवघड कामगिरी आहे. पण त्याच्या एखाद्या जिल्ह्याहूनही लहान असलेल्या गोव्यालाही ते अवघड वाटावे? सरकारची ही सुशेगाद वृत्ती दिवसागणिक जनतेला कोरोनाच्या जबड्यात ढकलते आहे याचे भान सरकारला येणार कधी? रोम जळत असताना फिडल वाजवत बसलेल्या गोव्याच्या सुस्त, सुशेगाद नीरोंना जागवायचे कोणी?