गोव्याचे ज्येष्ठ समीक्षक प्रा. रवींद्र घवी यांचे निधन

0
110

गोव्याचे ज्येष्ठ समीक्षक आणि धेंपेे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक रवींद्र घवी (७३) यांचे काल शुक्रवार दि. ५ रोजी संध्याकाळी कोथरूड पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त कळताच गोमंतकीय साहित्यविश्वाला धक्का बसला.

प्रा. घवी यांची मागोवा, गोमंतकीय मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ (संपादकीय), गोमंतकीय मराठी ग्रंथकारांची सूची, गोमंतकीय मराठी साहित्य सेवक मंडळाची वाटचाल (अमृतानुभव), निवडक चि. त्र्यं. खानोलकर अशी अनेक पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत.
१९७० साली श्री. घवी गोव्यात आले. तेव्हापासून ते गोव्याच्या साहित्य चळवळीशी निगडित होते. १९८० पर्यंत ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे पदाधिकारी होते. त्यानंतर ते कार्यकारिणीतून बाहेर पडले, तरी त्यांचा मराठी साहित्य संमेलने, मेळावे, चर्चासत्रे, व्याख्याने आदींमध्ये सतत सहभाग असे.
श्री. घवी हे गोव्याबरोबरच संपूर्ण मराठी विश्वाला ज्ञात असलेले लोकप्रिय साहित्यिक, समीक्षक होते अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समीक्षक डॉ. केशव सद्रे यांनी ‘नवप्रभा’ पाशी पुण्याहून बोलताना व्यक्त केली. श्री. घवी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्री. घवी यांनी सुरवातीच्या काळात कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपले शिक्षण पूर्ण केले होते याचेही स्मरण त्यांनी करून दिले.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनीही श्री. घवी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
प्रा. घवी हे एक कृतीशील चैतन्यमूर्ती होते. त्यांचे निधन हा मराठी साहित्यविश्वावर झालेला फार मोठा आघात आहे. त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात अशी प्रतिक्रिया डॉ. कोमरपंत यांनी दिली.