केकेआरने ओढवला पराभव

0
145

>> मुंबई इंडियन्सचा १० धावांनी विजय

कोलकाताना नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध काल मंगळवारी हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रुपांतर केले. विजयासाठी १५३ धावांचे माफक लक्ष्य असताना केकेआरला ७ बाद १४२ धावांपर्यंतच पोहोचता आले. विशेष म्हणजे ११व्या षटकात १ बाद ८३ अशा मजबूत स्थितीतून केकेआरने पराभव ओढवला. इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या मोसमातील हा पाचवा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांत संपला. सूर्यकुमार यादव (५६) व रोहित शर्मा (४३) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी करूनही मुंबईचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ख्रिस लिनच्या जागी संघात स्थान मिळालेला दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉक प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. ईशान किसन याला देखील खेळपट्टीशी जुळवून घेणे जमले नाही. हार्दिक पंड्याला सलग दुसर्‍या सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे शेवटच्या चार षटकात मुंबईला अपेक्षित वेगाने धावा करणे शक्य झाले नाही.

प्रसिद्ध कृष्णा वगळता केकेआरच्या उर्वरित नियमित गोलंदाजांना अचूक मारा केला. पण, खरी कमाल केली ती विंडीजच्या आंद्रे रसेल याने. त्याने आपल्या २ षटकात केवळ १५ धावा मोजून ५ गडी बाद करताना मुंबईचे कंबरडे मोडले. त्यामुळे मुंबईवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नितीश राणा (५७) व शुभमन गिल (३३) यांनी केकेआरला ८.५ षटकांत ७२ धावांची खणखणीत सलामी दिली. हैदराबादविरुद्ध चमकलेला राहुल त्रिपाठी आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. त्याच्यासह शाकिब. कर्णधार मॉर्गन व इतर आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. कृणाल, राहुल, बोल्ट व बुमराह यांनी केकेआरला जखडून ठेवत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

केकेआरला शेवटच्या पाच षटकात अवघ्या २० धावा करता आल्या. या कालावधीत त्यांनी ३ गडी देखील गमावले.रसेलचे अनेक झेलदेखील मुंबईने सोडले. परंतु, केकेआरला याचा लाभ उठवता आला नाही. आंद्रे रसेल, दिनेश कार्तिकसारखे फिनिशरसुद्धा केकेआरला तारू शकले नाही, मुंबईने या विजयासह केकेआरविरुद्धचा जय-पराजयाचा रेकॉर्ड २२-६ असा केला.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा त्रि. गो. कमिन्स ४३ (३२ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), क्विंटन डी कॉक झे. त्रिपाठी गो. वरुण २, सूर्यकुमार यादव झे. गिल गो. शाकिब ५६ (३६ चेंडू, ७ चौकार, २ षटकार), ईशान किशन झे. कृष्णा गो. कमिन्स १, हार्दिक पंड्या झे. रसेल गो. कृष्णा १५, कायरन पोलार्ड झे. कार्तिक गो. रसेल ५, कृणाल पंड्या झे. कृष्णा गो. रसेल १५, मार्को येन्सन झे. कमिन्स गो. रसेल ०, राहुल चहर झे. गिल गो. रसेल ८, जसप्रीत बुमराह झे. शाकिब गो. रसेल ०, ट्रेेंट बोल्ट नाबाद ०, अवांतर ७, एकूण २० षटकांत सर्वबाद १५२ गोलंदाजी ः हरभजन सिंग २-०-१७-०, वरुण चक्रवर्ती ४-०-२७-१, शाकिब अल हसन ४-०-२३-१, पॅट कमिन्स ४-०-२४-२, प्रसिद्ध कृष्णा ४-०-४२-१, आंद्रे रसेल २-०-१५-५
कोलकाता नाईट रायडर्स ः नितीश राणा यष्टिचीत डी कॉक गो. चहर ५७ (४७ चेंडू, ६ चौकार, २ षटकार), शुभमन गिल झे. पोलार्ड गो. चहर ३३ (२४ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), राहुल त्रिपाठी झे. डी कॉक गो. चहर ५, ऑईन मॉर्गन झे. येन्सन गो. चहर ७, शाकिब अल हसन झे. यादव गो. कृणाल ९, दिनेश कार्तिक नाबाद ८, आंद्रे रसेल झे. व गो. बोल्ट ९, पॅट कमिन्स त्रि. गो. बोल्ट ०, हरभजन सिंग नाबाद २, अवांतर १२, एकूण २० षटकांत ७ बाद १४२ गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-२७-२, मार्को येन्सन २-०-१७-०, जसप्रीत बुमराह ४-०-२८-०, कृणाल पंड्या ४-०-१३-१, कायरन पोलार्ड १-०-१२-०, राहुल चहर ४-०-२७-४, रोहित शर्मा १-०-९-०