राज्यात पावसाची हजेरी

0
124

काल मंगळवारी रात्री ७ च्या दरम्यान, गोव्यातील विविध भागांत पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. मात्र उन्हाळ्यातील उष्म्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना या पावसामुळे थंड वातावरणाचा आनंद लुटता आला.

राजधानी पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, साखळी, होंडा व राज्यातील विविध ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. परवा सोमवारपासूनच राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. तर मंगळवारी सकाळपासून पाऊस कोसळेल असे चित्र राज्यभर होते. मात्र पावसाने रात्री ७ च्या सुमारास राज्यातील विविध भागांत हजेरी लावली. त्यामुळे राज्यात थोडा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनाही दिलासा वाटला. मात्र यामुळे कामावरून घरी परतणार्‍या नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, पणजी वेधशाळेने उद्याही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.