गोमेकॉतील प्राणवायू व्यवस्था सुधारणार

0
59

>> ‘गार्ड’च्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्राणवायूचा पुरवठा करणार्‍या यंत्रणेचा दर्जा वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात रुग्णांसाठी प्राणवायूचा योग्य पुरवठा होत नसल्याची तक्रार निवासी डॉक्टरांच्या ‘गार्ड’ ह्या संघटनेने केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोमेकॉचे डीन आणि इतर अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोमेकॉतील प्राणवायूचा पुरवठा करणारा यंत्रणा जुनी झाली आहे. गोमेकॉला सध्या प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी चार कंपन्यांना सूचना करण्यात आली आहे. इस्पितळात पीएम केअर निधीतून मंजूर झालेल्या नवीन प्राणवायू प्रकल्प बसविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी प्राणवायू प्रकल्पाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कोवीड इस्पितळांत रुग्णांना प्रवेश देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची सूचना करण्यात आली आहे. गोमेकॉतील डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

विरोधकांची बैठक
दरम्यान, राज्यातील कोरोना महामारीच्या गंभीर बनलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मंगळवार ४ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता पर्वरी येथील विधानसभा संकुलातील आपल्या चेंबरमध्ये विरोधी आमदारांची बैठक आयोजित केली आहे.