गोमेकॉमध्ये प्राणवायू सिलिंडर उपलब्ध आहेत. परंतु ते वॉर्डात वेळेवर पोहोचत नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. तर, गोमेकॉमध्ये गैरव्यवस्थापन नसल्याचा दावा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. गोमेकॉमध्ये प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा कमी होतो. काही जणांकडून मुख्यंमत्र्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोमेकॉतील प्राणवायू प्रश्नाबाबत लक्ष घालावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राणे यांनी केली आहे.
गोमकॉमध्ये प्राणवायू पुरवठा कमी होतो की नियोजनाची कमी आहे हे उच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करून तपासण्यात यावे. प्राणवायू पुरवठ्याचे नियोजन उच्च न्यायालयाने आपल्या ताब्यात घ्यावे. न्यायालयाने प्राणवायू पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी आणि सूचना कराव्यात अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी केली.
गोमेकॉमध्ये प्राणवायू सिलिंडकरची कमतरता आहे. इस्पितळात १२०० प्राणवायू सिलिंडर मिळायला हवेत, तिथे फक्त ४०० प्राणवायू सिलिंडर देण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे गोमेकॉ तणावाखाली आले आहे. इस्पितळात प्रायवायूच्या मागणीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
मंगळवारी मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून चौकशी करण्याची गरज आहे. दररोज रात्री २ ते सकाळी ६ यावेळेत रुग्णांचे मृत्यू होतात. प्राणवायूच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी तीन नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नोडल अधिकार्यांनी रात्रीच्या वेळेत होणार्या रुग्णांच्या मृत्यूची दखल घेतली आहे का? असा सवाल करत आरोग्यमंत्री या नात्याने नियमितपणे मी मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या काळात होणार्या मृत्यूंची नोंद घेतो, अस राणे यांनी म्हटले आहे.