केंद्राने गोव्याचा प्राणवायू कोटा त्वरित द्यावा

0
141

>> प्राणवायू सिलिंडर प्रश्‍नी योग्य तोडगा काढा, उच्च न्यायालयाचे निर्देश

>> डीनना पुन्हा फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोमेकॉमध्ये प्राणवायू अभावी रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्देश दिल्यानंतरही बुधवारी मध्यरात्री २ ते गुरूवारी सकाळी ६ यावेळेत आणखी १५ रुग्णांचा बळी गेला आहे. न्यायालयाने या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून प्राणवायूच्या अभावी रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, गोमेकॉमधील ड्युरा सिलिंडर उभारणी, प्रशिक्षित ट्रॅक्टर चालक, प्राणवायू कॉन्संट्रेटर, गोमेकॉत मोठी प्राणवायू टाकी उभारणीबाबत शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचा न्यायालयाने निर्देश राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने गोव्याचा प्राणवायू कोटा त्वरित उपलब्ध करावा, असा निर्देश न्यायालयाने काल दिला.

राज्य सरकारच्या स्थिती अहवालाबाबत समाधान न झाल्याने कोविडप्रश्‍नी शनिवारी सुनावणी घेतली जाणार आहे. अन्यथा, सोमवारी कोविडप्रश्‍नी सुनावणी होणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने बुधवारी गोमेकॉमध्ये प्राणवायूच्या अभावी एकाही रुग्णाचा बळी जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिला होता. गोमेकॉमध्ये सुमारे चाळीसजणांचे बळी गेले आहेत. त्यात मध्यरात्री २ ते सकाळी ६ यावेळेत पंधराजणांचे बळी गेले आहेत. गोमेकॉमध्ये १ मेपासून मध्यरात्री २ ते सकाळी ६ यावेळेत अनेकांचे बळी जात आहेत. मध्यरात्रीच्या वेळी होणार्‍या बळीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गोमेकॉमध्ये मध्यरात्रीच्या वेळी उद्भवणारी प्राणवायू पुरवठ्याची गंभीर समस्या सोडविण्यात न आल्याने रुग्णांना फटका बसत आहे. राज्य सरकारने प्राणवायू सिलिंडरच्या हाताळणीच्या प्रश्‍नावर योग्य तोडगा काढला पाहिजे. गोमेकॉमध्ये प्राणवायूच्या अभावामुळे कुणाचेही प्राण जाता कामा नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गोमेकॉत १७ मेपर्यंत नवी
प्राणवायू टाकी उभारणार

गोमेकॉमधील प्राणवायूच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करण्याचे काम सुरू असून गुरुवारपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. ३२३ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध केले जात आहेत.

गोमेकॉमध्ये येत्या १७ मेपर्यंत नवीन प्राणवायू टाकी उभारण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. केंद्र सरकारने प्राणवायू पुरवठ्यामध्ये वाढ केली आहे. कमी प्राणवायूचा दाब असलेल्या वॉर्डातील गंभीर रुग्णांना दुसर्‍या वॉर्डात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. गोमेकॉ इस्पितळाला १२ मे २०२१ प्रमाणेच १३ मे २०२१ रोजी प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी न्यायालयात दिली.

डीनना पुन्हा फटकारले
न्यायालयाच्या निर्देशानंतर उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली असून परिस्थितीत सुधारणा होत आहे. सर्वच मृत्यू प्राणवायूच्या अभावामुळे झालेले नाहीत, असा दावा गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर यांनी न्यायालयात केला. आकडेवारी सांगत आहे की, रुग्णांचे बळी प्राणवायूच्या अभावामुळे गेले आहेत. आता विषय बदलू नका. आता प्राणवायू अभावी बळी नाकारू नका. आम्हांला माहीत आहे की, प्राणवायू समस्येवर अजून पूर्ण तोडगा काढण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने सुनावले.

संकटात नफ्याचा
विचार नको

कोरोना महामारीच्या संकट काळात कुणी जास्त नफा कमावण्याचे काम करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोना मृतांची वाहतूक करण्यासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली आहे. राज्य सरकार जादा शुल्क आकारण्याच्या विषयात लक्ष घालणार आहे, असे सरकारी वकील देविदास पांगम यांनी स्पष्ट केले.