गोंयच्या सायबाचे आज फेस्त

0
86
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरची द बॅसिलिका ऑफ बॉम जिझसमधील प्रतिमा. (छाया : किशोर स. नाईक)

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त आज उत्साहात साजरे होणार असून दिवसभरात अंदाजे एक लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काल रात्री फेस्ताच्या पूर्वसंध्येला मोठ्या संख्येने भाविकांनी जुने गोवे चर्च परिसरात गर्दी केली आहे.
आज जुने गोवे येथील सेकॅथेड्रल चर्च व द बॅसिलिका चर्च परिसरात सकाळपासून मोठी गर्दी दिसून येणार आहे. भाविकांसाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अवशेष दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे.आज दिवसभर तासाच्या अंतराने द बॅसिलिका चर्चच्या प्रांगणात उभारलेल्या सभा मंडपात प्रार्थना सभा घेण्यात येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता येथे प्रमुख प्रार्थना सभा होईल. यात निमंत्रित बिशप, आर्चबिशप व ज्येष्ठ धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. भाविकांना उपदेशपर संदेश देईल. या मुख्य प्रार्थना सभेला राजकीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. यात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचाही समावेश आहे.
वाहन पार्किंग, पिण्याचे पाणी, शौचालय आदिंची खास सोय येथे खास भाविकांसाठी करण्यात आली आहे. गोवा व महाराष्ट्र राज्यातील पोलिसांचा येथे ठिकठिकाणी बंदोबस्त राहणार आहे. मडगाव-पणजी, पणजी-फोंडा या राष्ट्रीय महामार्गावरून जुने गोवे येथे भाविक उपस्थित राहणार असल्याने बस स्टॉपजवळ पोलीस तैनात करण्यात येतील.
उद्या दिवसभर चालणारा व जुने गोवे येथील फेस्ताचा वार्षिक सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी जुने गोवे चर्चच्यावतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. चर्चचे स्वयंसेवकही ठिकठिकाणी मार्गदर्शनासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.