केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी

0
115

विद्वेषजनक वक्तव्यामुळे संसदेत गदारोळ
येथील एका सभेत विद्वेष पसरविणारे भाषण केल्याप्रकरणी काल लोकसभा व राज्यसभेतही विरोधकांनी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी करीत गदारोळ माजविला. अखेर निरंजन ज्योती यांनी सभागृहात क्षमायाचना केली. मात्र राजीनाम्यास त्यांनी नकार दिला. तर विरोधकांनी माफी उपयोगाची नसून त्यांनी राजीनामाच द्यायला हवा असा दावा केला.नवी दिल्लीतील एका प्रचारसभेतील एका भाषणादरम्यान साध्वी निरंजन ज्योती यांनी विद्वेषजनक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांनी माफी मागितली असल्याने त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदावर राहता कामा नये असा दावा भाकप नेते सीताराम येच्युरी यांनी केला आहे.
तथापि भाजप नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. मंत्र्यांनी माफी मागितली असल्याने अधिक ताणून धरण्यात अर्थ नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांना कोणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितले होते का असा सवाल उत्तर प्रदेश भाजपचे नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी केला. राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, ‘मै संत हूँ, संत होने के नाते भी मॉंफी मांगती हूँ. मै झुकने के लिए तैयार हूँ’. मात्र मंत्रिपद सोडण्यास त्यांनी नकार दिला. ‘मी लोकसभा व राज्यसभेतही माफी मागितली आहे. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी माझे शब्द मागे घेते. त्यांनी माफीची मागणी केली व मी माफी मागितली. आणखी काय हवे’, असे त्या म्हणाल्या.
मंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांकडून नाराजी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करून ही बाब स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे. तसेच अशी वक्तव्ये न करण्याचे निर्देश आपल्या खासदार-मंत्र्यांना दिले आहेत. सरकार व पक्षाला अडचणीत टाकणारी वक्तव्ये करू नयेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.