‘गुरुपौर्णिमा’ मराठीत तर ‘नाचुया कुंपासार’ कोकणीत सर्वोत्कृष्ट

0
155

>> गोवा राज्य चित्रपट महोत्सवाची थाटात सांगता

 

गोवा शासनाचे माहिती आणि प्रसिध्दी खाते व मनोरंजन सोसायटी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘गुरुपौर्णिमा’ व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘नाचुया कुंपासार’ हे अनुक्रमे मराठी व कोकणी चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही निवड जाहीर करून हे पुरस्कार प्रदान केले. प्रत्येकी पाच लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरुप होते.
महोत्सवाचा शानदार समारोप सोहळा मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात काल पार पाडला. सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत नाना पाटेकर, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, मृणाल कुलकर्णी, गायिका बेला शेंडे यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चॉंद लागले. मनोरंजनाचा कार्यक्रमही सोहळ्याची लज्जत वाढवणारा होता.
आल्जेरी ब्रागांझा स्मृती पुरस्कार प्राप्त नाचुया कुंपासार या चित्रपटाला उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी, संकलन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा रचना, ध्वनी योजना, उत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार, उत्कृष्ट अभिनेत्री असे अनेक अन्य पुरस्कार लाभले. मुख्यमंत्र्यांहस्ते गोमंतकीय सुपुत्र सिनेक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व एन्. चंद्रा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना रसिकांनी उभे राहून अभिवादन केले.
उत्कृष्ट कोकणी चित्रपटासाठीचा द्वितीय तीन लाख रुपयाचा पुरस्कार ‘होम स्वीट होम-१’ या चित्रपटाला प्राप्त झाला. उत्कृष्ट अभिनयासाठी खास परीक्षकांचा पुरस्कार अभिनेता विजय मोरिया व अभिनेत्री पालोमी घोष यांना देण्यात आले. उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मराठी विभागात गुरुपौर्णिमा चित्रपटातील सई ताम्हणकर व कोकणी विभागात अनघा जोशी या मानकरी ठरल्या. उत्कृष्ट अभिनेता म्हणून मराठीत उपेंद्र लिमये (गुरुपौर्णिमा) व कोकणीत जॉन डीसिल्वा (होम स्वीट होम) यांची निवड झाली. सहाय्यक अभिनेत्री म्हणून समीक्षा देसाई (एनिमी) व अभिनेता म्हणून राजदीप नाईक (होम स्वीट होम) यांना पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट कथानकाचे पुरस्कार स्वप्नील गांगुर्डे (मराठी-गुरुपौर्णिमा) व दिनेश भोसले (कोकणी-एनिमी) यांना प्राप्त झाले.
उत्कृष्ट संवादासाठी मराठीत जीतेंद्र देसाई (गुरुपौर्णिमा) तर कोकणीत स्वप्नील शेटकर (होम स्वीट) यांना पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार स्वप्नील शेटकर यांना देण्यात आला. ध्वनी योजनेचा कोकणीत अलोक देव (नाचुया कुंपासार), कला निर्देशनाचा अपर्णा रैना, वेशभूषा-श्‍वेता गोम्स, सिनमेटोग्राफी (के. वैकुंठ स्मृती)- सुहास गुजराती, भानुदास दिवकर संकलनाचा पुरस्कार बेनरॉय बार्रेटो, पार्श्‍वगायिका- मॅॅक्सी, पार्श्‍वगायक- आकासिओ, संगीत दिग्दर्शक- जेकोब फेरिया, गीतकार- रोहन नाईक, नॉन फिचर फिल्म विभागात- ध्वनी योजना मुकेश कोतवाल (द गेस्ट) हे पुरस्कारांचे मानकरी ठरले.
बेला शेंडेंनी रसिकांना जिंकले
समारोप सोहळ्यात लोकप्रिय गायिका बेला शेंडे यांनी मला वेड लागले प्रेमाचे, बंध जुळती हे प्रितीचे गोड नाते हे जन्मांतरीचे, हांव एक चली मोगरे कळी (सिध्दनाथ बुयांव यांनी संगीतबध्द केलेले गीत), वाजले की बारा अशा गीत रचना गाऊन रसिकांची मने जिंकली. वाजले की बाराला तर अर्थातच वन्समोरची उत्स्फूर्त दाद मिळाली.

एन्. चंद्रा यांना जीवन गौरव प्रदान
या सोहळ्यात एन्. चंद्रा (चंद्रशेखर नार्वेकर) या हिन्दी सिनेसृष्टीतील संकलक, दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता म्हणून फार मोठे लौकिक मिळविलेल्या गोमंतकीय सुपुत्राला जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.