गुजरातमधील हेरॉईनप्रकरणी आरोपी जोडप्याला कोठडी

0
78

गुजरातच्या मुंद्रा बंदरावरील जवळपास २१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने दिल्लीत मंगळवारी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासले जात आहे.

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी सापडलेली ही ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचे भासवले जात होते. प्रथ्यक्षात मात्र यात फार मोठे हेरॉईन असल्याचे सिद्ध झाले आहे. या कारवाईनंतर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीधाम आणि मांडवी भागातही छापेमारीची कारवाई केली जात आहे. दिल्ली आणि चेन्नईतही या प्रकरणा कारवाई होत आहे.