गुगल प्ले स्टोअरवरही व्हायरसचा धोका

0
97

>> सायबर सिक्युरिटी फर्मचा अँड्रॉईड मोबाईलधारकांना इशारा

अँड्रॉईड फोन वापरणार्‍यांसाठी गुगल प्ले स्टोअरवरून विविध ऍप्स डाऊनलोड करणे नेहमीचे असले, तरी या प्ले स्टोअरवर देखील व्हायरसयुक्त ऍप्स आहेत असा इशारा एका सायबर सिक्युरिटी कंपनीने दिला आहे. त्यामुळे आपण काय डाऊनलोड करतो आहोत याचा पूर्ण विचार करूनच ऍप्स डाऊनलोड करावीत असे आवाहन झेडस्केलर नामक कंपनीने केले आहे.

जोकर या कुप्रसिद्ध मेलवेअर आणि फ्लीसवेअरचे सतरा प्रकार या प्ले स्टोअरवर या सप्टेंबर महिन्यातच आढळून आले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. गरज नसताना विविध प्रकारच्या परवानग्या त्यातून वापरकर्त्यांकडे मागितल्या जातात व त्यातून गैरफायदा घेतला जातो असा इशाराही कंपनीच्या थ्रेटस्लॅब्झ सिक्युरिटी रीसर्च टीमने दिला आहे.

अधिकृत ऍप्सच्या सोर्स कोडमध्ये शिरकाव करून मोबाईलधारकांची माहिती पळवण्याचे प्रकार घडत असल्याचे सदर कंपनीचे म्हणणे आहे. डाऊनलोड केलेल्या ऍप्ससाठी गरजेच्या नसलेल्या परवानग्याही मागून फोनचा दुरुपयोग होत असल्याचे सांगण्यात येते. ऍप डाऊनलोड होत असताना पार्श्वभूमीवर अनधिकृत मेलवेअर डाऊनलोड होते व फोनवर ताबा मिळवते असे आढळून आल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. गुगलला याची माहिती दिल्यानंतर अनेक ऍप्स काढून टाकण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

गरज असेल तरच परवानग्या द्या
कोणतेही ऍप डाऊनलोड करीत असताना ते ज्या प्रकारच्या परवानग्या मागत आहे, त्या बहाल करणे खरोखरच आवश्यक आहे का याचा विचार वापरकर्त्यांनी करावा. ऍपला गरज असेल तरच कॅमेरा, मायक्रोफोन, फोन कॉल्स, यासारख्या विविध परवानग्या द्याव्यात, अन्यथा सेटिंग्समध्ये जाऊन त्याला अटकाव करावा असे मोबाईलधारकांना सुचवण्यात आले आहे.