सनरायझर्सने साकारला पहिला विजय

0
91

>> बेअरस्टोचे अर्धशतक; राशीद प्रभावी

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांच्या शानदार खेळीनंतर राशीद खानच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड रोखताना यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सनरायझर्सने ही लढत १५ धावांनी जिंकली.
दिल्लीने आज एकमेव बदल करताना आवेश खानच्या जागी अनुभवी द्रुतगती गोलंदाज ईशांत शर्माला संघात स्थान दिले होते. हैदराबादनेदेखील संघात दोन बदल करत विल्यमसनला मोहम्मद नबीच्या तर वृद्धिमान साहाच्या जागी अब्दुल समादला संघात जागा दिली होती.

सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला ७ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर झटपट तंबूत परतल्यानंतर ऋषभ पंत (२८), शिखर धवन (३४) आणि शिमरॉन हेटमायर (२१) विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु ते अपुरे पडले. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानच्या जाळ्यात तीनही महत्त्वाचे फलंदाज अडकल्याने दिल्लीला विजयांची हॅट्‌ट्रिक साधता आली नाही.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ४ गडी गमावत १६२ अशी धावसंख्या उभारली.

कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला शानदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ९.३ षटकांत ७७ धावांची सलामी दिली. अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने जमलेली ही जोडी फोडत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. त्याने वॉर्नरला यष्ट्यांमागे ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. कर्णधार म्हणून आपला ५०वा सामना खेळणार्‍या वॉर्नरने ३ चौकार व २ षट्‌कारांनिशी ४५ धावा जोडल्या. मनीष पांडे जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही व केवळ ३ धावा जोडून परतला. बेअरस्टो अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेच तंबूत परतला. त्याने २ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर केन विल्यमसने शानदार फटकेबाजी करीत (२६ चेंडूत ४१) संघाला १६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अब्दुल समाद १२ धावा काढून नाबाद राहिला. दिल्लीकडून कागिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. ऋषभ पंत गो. अमित मिश्रा ४६, जॉनी बेअरस्टो झे. एन्रिच नॉर्टजे गो. कागिसो रबाडा ५३, मनीष पांडे झे. कागिसो रबाडा गो. अमित मिश्रा ३, केन विल्यमसन झे. अक्षर पटेल गो. कागिसो रबाडा ४१, अब्दुल समाद नाबाद ११, अभिषेक शर्मा नाबाद १.
अवांतर ः ७. एकूण २० षट्‌कांत ४ बाद १६२.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-७७ (डेव्हिड वॉर्नर, ९.३), २-९२ (मनीष पांडे, ११.२), ३-१४४ (जॉनी बेअरस्टो, १७.५), ४-१६० (केन विल्यमसन, १९.४),

गोलंदाजी ः ईशांत शर्मा ३/०/२६/०, कागिसो रबाडा ४/०/२१/२, एन्रिच नॉर्टजे ४/०/४०/०, मार्कुस स्टॉइनिस ३/०/२२/०, अमित मिश्रा ४/०/३५/२, अक्षर पटेल २/०/१४/०.
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. जॉनी बेअरस्टो गो. भुवनेश्वर कुमार २, शिखर धवन झे. जॉनी बेअरस्टो गो. राशीद खान ३४, श्रेयस अय्यर झे. अब्दुल समाद गो. राशीद खान १७, ऋषभ पंत झे. प्रीयम गर्ग गो. राशीद खान ३२, शिमरॉन हेटमायर झे. मनीष पांडे गो. भुवनेश्वर कुमार २१, मार्कुस स्टॉइनिस पायचित गो. टी. नटराजन ११, अक्षर पटेल नाबाद १५, कागिसो रबाडा नाबाद ३.
अवांतर ः ७. एकूण २० षटकांत ७ बाद १४७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १-२ (पृथ्वी शॉ, ०.५), २-४२ (श्रेयश अय्यर, ७.२), ३-६२ (शिखर धवन, ११.३), ४-१०४ (शिमारॉन हेटमायर, १५.१), ५-११७ (ऋषभ पंत, १६.४), ६-१२६ (मार्कुस स्टॉइनिस, ९.३), ७-१३८ (अक्षर पटेल, १९.३).
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४/०/२५/२, खलील अहमद ४/०/४३/१, टी. नटराजन ४/०/२९/१, अभिषेक शर्मा ४/०/३४/०, राशीद खान ४/०/१४/३.