जम्मू आणि काश्मीरच्या युतीचे सरकार पडल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लावलेले आरोप पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी काल फेटाळले आहेत. पीडीपीने युतीच्या कार्यक्रम पत्रिकेपासून कधीच माघार घेतली नाही. आपल्या पक्षावर लावले जाणारे आरोप खोटे धादांत खोटे आहेत असे माजी मुख्यमंत्री महबुबा यांनी म्हटले आहे.
शहा यांनी शनिवारी जम्मूत एका सभेला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरच्या विकासाचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याच्या परिस्थितीत भाजपने या राज्यातील सत्तेवर राहण्यास काहीच अर्थ नव्हता असे म्हटले होते. मेहबुबा यांनी केलेल्या ट्वीटप्रमाणे, युतीचा अजेंडा राम माधव आणि राजनाथ सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तयार केला होता. तो पूर्ण करण्यात आम्ही कुठल्याही प्रकारची हय-गय केलेली नाही. हे पाहून दुख वाटते, की भाजपने आपली हात झटकले. तसेच उलट पीडीपीने अजेंडा पूर्ण केला नाही असे आरोप लावले. आम्ही सुधारणांसाठी जी पावले उचलली त्यामुळे परिणाम जमिनी स्तरावर लोकांचा सरकारवर विश्वास वाढला. भाजपने सुद्धा हे मान्य करून त्याचे कौतुक केले होते. कलम ३७० कायम ठेवणे असो वा हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणे या सर्व गोष्टी आपला अजेंडा होता. जमिनी पातळीवर विश्वास संपादित करणे आणि चर्चा करणे अत्यावश्यक होते असे मेहबुबा यांनी म्हटले आहे.