गरोदर महिलांचे आजपासून लसीकरण

0
94

>> डॉ. राजेंद्र बोरकर यांची माहिती

राज्यातील गरोदर महिलांच्या लसीकरणाला आज शुक्रवार ९ जुलैपासून सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील गरोदर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. गरोदर महिलांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या गटांतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही मोहीमसुद्धा यशस्वी होणार आहे, असा विश्‍वास यावेळी डॉ. बोरकर यांनी व्यक्त केला.

राज्यातील ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती आणि नेपाळी रहिवाशांचे लसीकरण येत्या रविवार ११ जुलै रोजी मडगाव येथील टी. बी. कुन्हा लसीकरण केंद्रात करण्यात येणार आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

१०.२५ लाख नागरिकांना लस
राज्यात आत्तापर्यत १०.२५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लशीचा डोस देण्यात आला आहे. ८ लाख ८८ हजार नागरिकांना प्रथम डोस तर १ लाख ४७ हजार नागरिकांना दोन्ही डोस दिले आहेत. राज्यातील साधारण ७३ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. येत्या जुलैअखेर आवश्यक लक्ष्य पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

चोवीस तासांत कोरोनामुळे १९५ कोरोनाबाधित, ४ मृत्यू

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे १९५ रुग्ण आढळून आले असून आणखी ४ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १९६५ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३०८६ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत राज्यात आणखी ४ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात २ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १ रुग्ण आणि खासगी इस्पितळात १ रुग्णांचा बळी गेला आहे.

इस्पितळांतून १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार २१० एवढी झाली आहे. चोवीस तासांत ४६९६ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १९५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनाबाधित नव्या २६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. कापल आणखी १७६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार १५९ एवढी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.