गोमंतशाहीर

0
70

(विशेष संपादकीय)

ही माझी कविता मिरविते |
माझ्या गोव्याचीच मिरास ॥
स्वर्गाला लाथाडून घेईन |
इथल्या मातीचाच सुवास ॥
गोव्यावरचे आणि गावावरचे आपले नितांत प्रेम असे सदैव कविता आणि गाण्यांतून गात आलेले गोमंतकाचे अग्रणी कवी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गजानन रायकर यांनी आपल्या ह्या परमप्रिय भूमीचा काल निरोप घेतला. बांदकरांच्या, बोरकराच्या परंपरेचा वारसा मिरवतानाच आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम करून केलेल्या जन्मजात पोरकेपणाला ‘मी निजाचा गावडा रे, गावगाड्याचा धनी |’ म्हणत इथल्या कष्टकरी कामेर्‍यांच्या, कुळवाड्यांच्या व्यथा वेदनांशी जोडून घेणारी त्यांची बहुपेडी कविताही आज पोरकी झाली आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी लढता लढता ‘रोवू चला पणजीवर विजयी झेंडे’ असे गात गात त्या लढ्यामध्ये जोश भरणारा लढवय्या गोमंतशाहीर आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.
गजानन रायकर बोरकरांच्या परंपरेतले. कविता म्हणण्यापेक्षा ती सुंदर चालींमध्ये खड्या स्वरात गाऊन सादर करणे त्यांना आवडायचे. गोव्याची ही भूमी, इथला निसर्ग यांचे अत्यंत समरसून गुणगान तर त्यांनी आपल्या कविता आणि गीतांमधून अखंड केले.
‘नारळी पोफळी ऋद्धी आणि सिद्धी |
कोकम कर्दळी उभ्या अभिवृद्धी ॥
निर्झर निळे हे तीर्थांचे प्रवाह |
जलाशयाकाठी खेळती गंधर्व ॥ अशा ह्या प्रिय गोमंतकामध्ये जन्मल्याचा अभिमान मिरवताना इथल्या कुळागरांत गंधर्व आपल्या गळ्यांतला गंधार सांडताना आणि कर्दळीच्या झाडावर इंद्र महावस्त्र विसरताना त्यांच्यातल्या कवीला दिसला आणि समरसून त्यांनी ती कल्पनाचित्रे शब्दांकित केली. परंतु त्याच बरोबर ज्या समाजामध्ये आपण जन्मलो, त्याच्या भाळी असलेले उपेक्षेचे जिणेही त्यांना विसरता आले नाही. ती वेदनाही त्यांच्या काव्यातून सदैव ठणकत राहिली. इथल्या माडांनाच त्यांनी प्रश्न विचारला –
‘‘मी माडांना म्हटले तेव्हा |
या मातीतच पाय रोवुनी | तुम्हीच धरता शिरी अबदागिर ॥
उरात भरुनी कसे हासता | थयथयणारे विराट वादळ??’
बालपणीच आई गेल्याने त्या पोरकेपणाच्या भावनेने रायकरांना कायमचे अस्वस्थ बनवले. ‘शाप पोरकेपणाचा जन्मभर जाचताहे’ हे खरे होतेच, परंतु त्याचबरोबर आपल्यावर मायेची पाखर धरणारी माणुसकीही त्यांना पावलोपावली भेटत राहिली. तिने त्यांना उभारीही दिली.
अनेक माउल्यांनी ह्या ‘कुळवाड्याच्या पोरक्या पोरा’ला जगण्याची हिंमत दिली. नाट्यतपस्वी तातोबा वेलिंगकरांनी, वसंत आमोणकरांनी त्यांना नायक म्हणून नाटकात उभे केले. आत्मविश्वास मिळवून दिला.
गरिबीतले, कष्टांचे बालपण होते. कधी गुराख्याचे काम, तर कधी हॉटेलमधले, ‘मला पगार देऊ नका, त्याऐवजी शाळेत घाला’ असे मालकाला सांगून रायकरांनी जिद्दीने शिक्षण घेतले होते, परंतु जेव्हा त्यांनी शिक्षकी पेशात उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘गुरे राखण्याइतके ते सोपे आहे होय?’ असे विचारून त्यांची अवहेलनाही झाली. ‘आहे ठाऊक मजला माझा मार्ग निखार्‍यांचा |’ म्हणत असतानाच ‘आहे पुरता विश्वास मला माझ्या पावलांचा ॥ ही मनातली जिद्द त्यांनी करपू दिली नाही. सुदैवाने कवितेचे देवाचे ताट त्यांच्या हाती आले. ह्या रानजाईला कवितेचे फूल आले. त्यांची कविता कधी हळुवार गाऊ लागली –
‘रानजाईला आले फूल | फुलाभोवती रुंजी घाली रानपरीची हळवी भूल ॥
गोवा मुक्तिलढ्यात उतरल्यावर हाच कवी –
‘‘सह्याद्रीचे उंच कडे | स्वागतास सज्ज खडे ॥
दशदिशांत विजयाचे | झडती चौघडे ॥
छातीची करुनि ढाल | हाती क्रांतीची मशाल ॥
उष्ण करून रक्ताचे | सांडुनी सडे |
व्हा पुढे चला पुढे | रोवू चला पणजीवर विजयी झेंडे’’ अशा धगधगत्या शब्दांच्या ज्वाळा कवितेतून प्रकटू लागला. गोमंतशाहिराची भूमिका हिरिरीने बजावू लागला.
अण्णा देशपांडे, पीटर आल्वारिस, सिंधुताई देशपांडे अशा गोवा मुक्तिलढ्यातील झुंजार सेनानींनी रायकरांना त्यांच्या जीवनाची वाट दाखवली.
आझाद गोमंतक दल आणि नंतर नॅशनल कॉंग्रेस, गोवामध्ये वावरताना गोवा मुक्तीलढ्याच्या होमकुंडाला चेतविण्यासाठी ते आपल्या गीतांच्या समिधा अर्पित राहिले. मुक्तीलढ्यातील सहभागाबद्दल क्रूरकर्मा मोंतेरोने जबर मारहाणीत त्यांचे दोन्ही हात मोडले. ह्या झुंजार कवीने तुरुंगाच्या तटावरून उडी मारून शिवाजी देसाईंसह धाडसी पलायनही केले. मुक्तीलढ्यातील भले बुरे अनुभव घेतले, परंतु कवितेची सोबत मात्र सुटू दिली नाही. म्हणूनच तर बॅ. नाथ पैंनी भाऊसाहेब बांदोडकरांना ‘कुणालाही विसरता न येणारा हा माणूस आहे’ असे बजावले होते.
मुक्त गोमंतकाच्या पहिल्या निवडणुकीत मगो पक्षाशी युती केलेल्या प्रजासमाजवादी पक्षाचे फोंड्याचे आमदार बनण्याचे भाग्यही रायकरांना लाभले, परंतु ध्येयवादाची धग सत्तेच्या उबेपेक्षा त्यांना अधिक मोलाची वाटली यात नवल नाही. कवी, नट, शिक्षक, क्रांतिकारक, पुढारी, पत्रकार अशा अनेक भूमिका रायकरांनी आपल्या जीवनात वठविल्या, परंतु आपली कवी म्हणून ओळख हीच त्यांनी मोलाची मानली होती. ‘नवप्रभे’तून रायकरांना आम्ही त्यांच्या वादळी जीवनप्रवासाविषयी आवर्जून लिहिते केले होते. ‘आपल्या आईने आपल्या काळजात कवितेचा वेल लावला. ही अमृतवेल नसती तर जीवन निरस झाले असते,’ असे त्यांनी त्यातील एका लेखात लिहिले होते.
रायकरांची कविता ही ह्या मातीतली कविता आहे. मातीचे गायन ऐकता ऐकता मी गुणगुणत गेलो आणि ओठांवर आलेले शब्द उद्गार बनले असे त्यांनी आपल्या ‘रंगयात्रा’ मध्ये म्हटले आहे. साजणखुळा करणार्‍या चांदणगोरीवरची कविता करणारे रायकर कामेर्‍यांच्या गायनाचे काळजात भरून घेतलेेले सूर विसरू शकले नाहीत. त्या कहाण्या त्यांच्या मनात घर करून राहिल्या. त्यातून रायकरांनी कथाही लिहिल्या. त्यातून गोव्याच्या कष्टकर्‍यांचे दुःख मांडले. त्यांच्या ‘नातालीन’ ला रंगनाथ पठारेंची प्रस्तावना आहे. त्यात पठारेंनी रायकरांच्या कथांचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. सुखाच्या सुवारीपेक्षा कष्टकर्‍यांच्या दुःखाची बनवड रात्रभर त्यांच्या काळजात वाजत राहिली होती. त्यांच्या ‘दादुली’ ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कारही लाभला. परंतु रायकर खरे रमले ते कवितेतच. मराठीचे ते प्रखर अभिमानी होते.
ज्ञानेश्‍वरांची पालखी पुण्यभूमीत आणावी |
आंबियांची ज्ञानज्योती ज्ञानरायाला दावावी ॥
हे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांच्या कवितेला हा उज्ज्वल वारसा होता. म्हणूनच त्यांनी लिहिले –
‘‘आंबियांच्या ज्ञानदिव्याच्या प्रकाशात लिहिण्या बसतो |
बांदकरांच्या चरणाजवळी कौल शारदेचा घेतो ॥
शारदेने माथ्यावर वरदहस्त जरूर ठेवला, परंतु रायकरांच्या कवितेचे जेवढे कौतुक व्हायला हवे होते तेवढे झाले नाही. कलासक्त म्हणवणार्‍या गोमंतकीयांना ‘लागची व्हकल कुड्डी’ मानण्याचे हे लांच्छन आहेच!