>> सत्ताधारी आमदार नीलेश काब्राल यांना भीती
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यास जर गोवा सरकारला अपयश आले तर आगामी लोकसभा निवडणूक भाजपला जड जाऊ शकते, अशी भीती कुडचडे मतदारसंघाचे भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी काल व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर खाण उद्योग पुन्हा सुरू व्हावा म्हणून प्रयत्नरत असून आगॅस्टच्या पहिल्या आठवड्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काल या प्रतिनिधीशी बोलताना काब्राल म्हणाले की, राज्यातील खाण उद्योग हा येथील अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. मात्र, खाण उद्योग बंद पडल्याने हा कणाच मोडला आहे. खाण उद्योग बंद पडल्याने खाणपट्ट्यातील जनतेवरच परिणाम झालेला आहे असे बर्याच लोकांना वाटत असले तरी वस्तुस्थिती फार वेगळी असल्याचे ते म्हणाले. खाण उद्योग बंद पडल्याने कुळे ते मुरगाव व पेडणे ते सांगेपर्यंतच्या जनतेवर परिणाम झाला असल्याचा दावा काब्राल यांनी केला.
खाण उद्योग बंद पडल्याने मुरगाव बंदरावर कधी नव्हे एवढा परिणाम झालेला असून बंदरावर काम करणार्या कामगारांवरही उपासमारीची पाळी येण्यासारखी स्थिती निर्माण झाली अहे. बार्जमालक, बार्जेसवर काम करणारे कामगार, खनिज ट्रकमालक, या ट्रकांचे ड्रायव्हर व अन्य, खाणींवर काम करणारे कामगार, खाणींवर अवलंबून असलेले गॅरेज मालक, अन्य संबंधीत उद्योग असे हे एक मोठे वर्तुळच आहे. या सर्व लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही जनता त्रस्त झालेली आहे. त्यांना सर्वत्र अंधारच दिसत आहे. सरकारने काही तरी करून खाणी सुरू कराव्यात अशी या लोकांची मागणी आहे. खाणी सुरू झाल्या नाहीत तर ह्या लोकांच्या घरातील चुली पेटणे कठीण आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपचे नेते येत्या लोकसभा निवडणुकीत ह्या लोकांच्या दारात मते मागण्यासाठी कसे जाऊ शकतील व गेलेच तर त्यांना हे लोक कसे सहकार्य करतील, असा प्रश्न काब्राल यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता तातडीने पावले उचलण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
लिलाव योग्य पर्याय नव्हे
राज्यातील खाणींचा लिलाव करणे हा चांगला पर्याय नसल्याचे काब्राल म्हणाले. खाणींचा लिलाव केल्यास खाणी ४-५ वर्षे तरी सुरू होऊ शकणार नाहीत. कर्नाटकमध्ये तसे घडले असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
पर्रीकर ऑगस्टमध्ये
पंतप्रधानांना भेटणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खाणप्रश्नी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, असे आमदार नीलेश काब्राल यांनी काल सांगितले. राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी पर्रीकर हे प्रयत्नरत आहेत. परवाच त्यांनी खाणप्रश्नी चर्चा करण्यासाठी खाणपट्ट्यातील आमदारांची बैठक घेतली होती. आपण केरळमध्ये असल्याने या बैठकीला हजर राहू शकलो नसल्याचे ते म्हणाले. भाजपच्या शिष्टमंडळानेही यापूर्वी नवी दिल्लीत जाऊन खाणप्रश्नी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती, असे ते म्हणाले.