खाणी सुरू करण्याच्या भाजपच्या आश्‍वासनाचे काय झाले?

0
92

कॅसिनो, प्रादेशिक आराखड्याबाबतही कॉंग्रेसचे प्रश्‍न
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले होते त्याचे काय झाले? अजून खाण उद्योग सुरू का होत नाही? असे सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेतून केला. राज्यात ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झालेला असून त्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी केला.लोकायुक्त, प्रादेशिक आराखडा आदी प्रश्‍न सोडवण्यास भाजपला अजून का यश येत नाही. मांडवीतील कॅसिनो खोल समुद्रात नेण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले या सर्व प्रश्‍नांची उत्त्तरे भाजपने द्यावीत अशी मागणी श्री. कवठणकर यांनी केली.
राज्यात अमली पदार्थांचा व्यवहार जोरात सुरू असून त्यात हात असलेल्यांना अटक करण्यास सरकारला अपयशच आले असल्याचे ते म्हणाले.
उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा जुवारी पूल मोडकळीस आलेला असून या नदीवर नवा पूल लवकरात लवकर उभारण्याची गरज असताना सरकारने मात्र पणजीत मांडवी नदीवर तिसरा पूल उभारण्यास प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. जुवारीवरील जुना पूल मोडल्यास मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पणजी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची गरज असून त्यासाठी सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.