खाजगी वनक्षेत्राच्या नावाखाली प्रचंड घोटाळा : सरदेसाई

0
110

खासगी वनक्षेत्राच्या नावाखाली सध्या प्रचंड मोठा घोटाळा चालू असल्याचा आरोप काल माजी वनमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला विधानसभेत केला. त्याची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती स्थापन केली जावी, अशी मागणीही सरदेसाई यांनी यावेळी केली.
खासगी वनक्षेत्र पूर्वीपेक्षा कितीतरी कमी दाखवण्यात आल्याने आपण वनमंत्री असताना जो अहवाल फेटाळला होता त्या अहवालाला आता सरकार अंतिम रूप देऊ पाहत असून त्यासाठी सरकारने नवी समिती स्थापन केली असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे आहे. त्यांना अहवाल द्यावा लागणार असून आपण तो त्यांना देणार आहे. यावेळी बाबू आजगावकर व विजय सरदेसाई त्यांच्यात मोठी शाब्दीक चकमक झडली. यावेळी सरदेसाई यांनी बाबू यांना उद्देशून अपशब्द काढल्याने एकच गोंधळ माजला. हे अपशब्द मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी व काही आमदारांनी केली. सभापतींनी मग ते अपशब्द काढून टाकल्याची घोषणा केल्यानंतर वाद मिटला.