खांडेपार नदीत दोघे बुडाले

0
131

>> ओकांबमधील घटना; पोलिसांकडून शोध सुरू

ओकांब-धारबांदोडा येथील खांडेपार नदीत सोमवारी दुपारी फोंड्यातील दोघे युवक-युवती बुडाल्याची घटना घडली. ओकांब येथे सहलीसाठी सात युवक-युवतींचा गट गेला होता. त्यापैकी दोघे खांडेपार नदीत बुडाले. प्रदीप निंगप्पा मलनावर (वय १६, रा. पिसगाळ-कुर्टी) आणि सानिया रफिक मुल्ला (वय १७, रा. दीपनगर-कुर्टी) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत. दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस आणि अग्निशामक दलाकडून शोध सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सहलीसाठी चार युवक आणि तीन युवतींचा एक गट ओकांब येथे गेला होता. ओकांब येथील खांडेपार नदीपात्रात मौजमजा केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर येताना सानिया मुल्ला ही युवती पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी प्रदीप मलनावर हा देखील पाण्यात उतरला. मात्र काही क्षणातच दोघेही पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने दिसेनासे झाले.
या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आणि जवानांनी केला; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते सापडले नव्हते.

दरम्यान, फोंडा पोलिसांनी उर्वरित तीन युवक आणि दोन युवतींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.