मे महिन्यात सर्वाधिक कोरोना बळींची नोंद

0
79

>> १,४८१ जणांचा मृत्यू, तर ६४,६१४ बाधित

कोरोना महामारीच्या काळात यंदाचा मे महिना गोव्यासाठी घातक ठरला. या महिन्यात राज्यात हजारो कोरोनाबाधितांचा बळी गेला. या मे महिन्यात सर्वाधिक कोरोना बळींची नोंद झाली असून, १,४८१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना बळींपैकी ५५ टक्के बळींची नोंद फक्त मेच्या एका महिन्यात झाली. एप्रिल महिन्यात ३३८ रुग्णांचा बळी गेला होता. राज्यातील एकूण बळींची संख्या २६४९ एवढी झाली आहे. तथापि, मे महिन्याच्या अखेरीस नव्या रुग्णांच्या संख्येत घट आणि कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

मे महिन्यात नवे ६४ हजार ६१४ कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यात एका महिन्यात आढळून आलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. मे महिन्यात १ लाख ७० हजार १२१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६४ हजार ६१४ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. नवीन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत मोठी घट झाली होती. या महिन्याच्या अखेरीस रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पुन्हा ९० टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. या महिन्यात ७३ हजार ३१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

बहुतांश इस्पितळे झाली फुल्ल
राज्यातील नव्या कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने इस्पितळातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा अपुर्‍या पडल्याने रुग्णांना खुर्ची, स्ट्रेचर आणि जमिनीवर झोपवून उपचार केले जात होते. त्यामुळे मडगाव, म्हापसा, फोंडा, वास्को येथील सरकारी इस्पितळांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने राज्यातील २७ खासगी इस्पितळांतील ५० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला होता.

मे अखेरीस रुग्णसंख्येत घट
मे महिन्याच्या अखेरीस इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाल्याने इस्पितळ प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. मे महिन्यात ६ हजार ७९२ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

सलग तिसर्‍या दिवशी रुग्णसंख्येत घट

राज्यात मे महिन्याच्या अखेरच्या तीन दिवसात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येवर अजूनपर्यंत नियंत्रण आलेले नाही. गेल्या २४ तासांत नव्या ६०२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर आणखी २४ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील आणखी १८२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ७६३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २६४९ एवढी झाली आहे.
राज्यात सलग तिसर्‍या दिवशी एक हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २५ ते ३५ च्या आसपास आले आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांमधून १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५५ हजार ६६६ एवढी झाली आहे.
२४ तासांत २४ बळी
राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत आणखी २४ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १६ रुग्णांचा, दक्षिण गोवा इस्पितळात ४ रुग्णांचा, उत्तर गोव्यातील दोन खासगी इस्पितळात ३ रुग्णांचा बळी गेला आहे, तर हॉस्पिसिओ इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या पाच रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.
नव्या ६०२ रुग्णांची नोंद
राज्यात चोवीस तासांत नवे ६०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ३००४ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील २०.०३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासा देणारी आहे.
रुग्णसंख्या हळूहळू घटतेय
मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०७२ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६०१ आणि चिंबलमधील रूग्णसंख्या ४७८ एवढी आहे. कांदोळी, फोंडा, पर्वरी, कासावली, कुठ्ठाळी या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे.
२४ तासांत १०२ रुग्ण इस्पितळांत
गेल्या चोवीस तासांत नव्या १०२ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्याही बरीच कमी झाली आहे.
पॉझिटिव्हिटी दरात देखील घट
कोरोना पॉझिटिव्हिटी दर २०.०३ टक्क्यांवर आला आहे. मेच्या मध्यास पॉझिटिव्हिटी दर ४५ ते ५० टक्क्यांवर पोहोचला होता.

१८२५ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी १८२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार २५४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१० टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.