खलिस्तानवाद्यांचे हस्तक

0
93

गेल्या २६ जानेवारीच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाआड लपून स्वतःचे मतलब साध्य करू पाहणार्‍या काही घटकांचे बुरखे एव्हाना फाडले गेले आहेत. ग्रेटा थनबर्गने ट्वीटरवर टाकलेल्या आणि नंतर काढून टाकलेल्या ‘टूलकिट’ ने ह्या सार्‍या कटकारस्थानाचा उलगडा केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसाचार माजवण्याचा हा कट खलिस्तानवाद्यांनी शिजवला होता आणि भारतातील काही तरूण सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून तो प्रत्यक्षात उतरवला जात होता हे या ‘टूलकिट’ प्रकरणातून सिद्ध होते आहे.
शेतकरी आंदोलन, त्यांचा प्रामाणिक निर्धार, त्यांच्या मागण्या हे सगळे राहिले एका बाजूला, परंतु शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याच्या नावाखाली भारत सरकारविरुद्ध एक व्यापक षड्‌यंत्र रचले जात होते हेच या ‘टूलकिट’ प्रकरणातून दिसून येते. ‘पोएटिक जस्टीस फाऊंडेशन’ ही खलिस्तानवादी संघटना या सार्‍यामागे होती याचे धागेदोरे पोलिसांनी एव्हाना उकलून काढले आहेत. या संघटनेवर भारतात बंदी आहे, परंतु सुखवस्तू शीख समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या कॅनडामधून ह्या संघटनेचे उपद्व्याप चालत असतात. भारतातील काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संधान साधून दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक आणि आक्रमक बनविण्याचा डाव कसा आखला गेला त्याचा हे ‘टूलकिट’ हा तर पुरावाच आहे.
एखादी गोष्ट कशी करावी याचे मार्गदर्शन कोणतेही ‘टूलकिट’ करीत असते. यापूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्येही एकसंधता आणि एकसूत्रता यावी यासाठी अशा प्रकारच्या निश्‍चित मार्गदर्शक सूचना ‘टूलकिट’ द्वारे प्रसृत करण्याचे प्रकार जगभरात झाले आहेत. भारतातही नागरिकत्व दुुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये अशाच प्रकारच्या टूलकिटचा वापर झाला होता हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे दिल्ली हिंसाचार प्रकरणात जेव्हा ग्रेटा थनबर्गने असे टूलकिट प्रसृत केले तेव्हा कोणताही वेळ न दवडता पोलिसांनी त्याची पाळेमुळे खणून काढायचा निर्णय घेतला आणि त्यातून एकेक धागे जुळत गेले आहेत. आता अटक झालेली सामाजिक कार्यकर्ती दिशा किंवा ज्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट निघाले आहेत ती निकिता, शंतनु यांचा या पीजेएफच्या हस्तकांशी संबंध आला होता, त्यांनी परस्परांसमवेत झूम बैठक घेऊन सारी योजना बनवली होती अशी माहिती तपासात समोर आलेली आहे. हेच टूलकिट नंतर ग्रेटाला पाठवले गेले. हे सगळे करीत असताना आत्यंतिक गुप्तता पाळली गेली होती. खास व्हॉटस्‌ऍप ग्रुप काय बनवला, टेलिग्रामवरून फाईल पाठवताच ते टेलिग्राम खाते काढून काय टाकले गेले! शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीटरवरून वादळ निर्माण करण्याचा बेत या मंडळींनी आखला होता आणि त्यानुसार सूचना ह्या टूलकिटमधून देण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर विदेशांतील जवळच्या भारतीय दूतावासांबाहेर निदर्शने करण्याचा बेतही आखला गेला होता. हे सगळे पाहिले तर शेतकरी आंदोलन राहिले बाजूलाच, या मंडळींचे इरादे काही वेगळेच होते हे स्पष्ट होते. शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शविण्याच्या नावाखाली त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या मंडळींना गोळी वेगळ्याच दिशेने मारायची होती. आता हे करण्यास आणखी कोणकोणाचा त्यांना पाठिंबा होता, कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती त्यामागे होत्या हे सगळे समोर आल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे दिशाचे वय, अटक करताना योग्य प्रकारे केली गेली नाही, न्यायालयात वकिलांना हजर राहता आले नाही वगैरे वगैरे गोष्टी पुढे करून झालेल्या अटकेबाबत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न जरी चालला असला, तरी मुळातील कारस्थानाचे गांभीर्य त्याने कमी होत नाही. वय कमी होते म्हणजे जो चालला होता तो पोरखेळ होता काय? भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन व्हावी असा पद्धतशीर प्रयत्न तर यातून झालाच, परंतु प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीमध्ये हिंसाचार व्हावा, शेतकरी आंदोलन अराजकात रूपांतरित व्हावे यादृष्टीने खलिस्तानवाद्यांनी जे काही बेत आखले होते, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी या ‘टूलकिट’ ची निर्मिती झाली होती हे कसे विसरायचे? त्यामुळे सहानुभूती वगैरे दर्शवणार्‍यांनी आधी पोएटिक जस्टीस फाऊंडेशनशी असलेल्या या मंडळींच्या लाग्याबांध्यांविषयी स्पष्टीकरण द्यायला हवे. बी. एस. भिंदर, पी. एस. फ्रेड्रिक, मो धालीवाल सारख्या विदेशस्थ खलिस्तानवादी मंडळींशी या टूलकिटचे धागेदोरे का जुळतात, त्या गुगल डॉक्युमेंटवरील हायपरलिंक थेट खलिस्तानसमर्थक गोष्टींपर्यंत का पोहोचतात याचे उत्तर आधी द्यावे!