पँगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील सैन्य मागे घेण्यास चीनकडून सुरूवात

0
193

राजनैतिक व लष्करी पातळीवरील सफल वाटाघाटींअंती चीन आणि भारत यांच्यात परस्परांचे सैन्य पँगॉंग त्से सरोवराजवळच्या मूळ ठाण्यांवर परत नेण्याबाबत सहमती झाल्याने चीनने सरोवराच्या उत्तर किनार्‍यावर फिंगर ५ जवळ उभारलेला धक्का व जवळच उभारलेले हेलिपॅड काढून टाकले आहे. तेथील तंबू व निरीक्षण चौक्याही हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आठ महिने पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत झालेल्या तणातणीनंतर प्रथमच शांततेच्या दिशेने दोन्ही देशांनी ही पावले टाकली आहेत. नुकत्याच झालेल्या समझोत्यानुसार चीन आपले सैनिक फिंगर ३ पर्यंत मागे हटवणार असून भारत आपले सैन्य धनसिंग थापा प्रशासकीय छावणीपर्यंत मागे घेणार आहे. ११ फेब्रुवारीला राजनाथसिंग यांनी संसदेत तशी घोषणा केली होती. सैन्य मागे घेण्याची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया वीस दिवसांत पूर्ण होईल. मात्र, यामुळे भारताने उंच टेकड्यांवर उभारलेली आपली ठाणीही बंद करावी लागणार आहेत. पँगॉंग त्सेच्या दक्षिणेत उतरवले गेलेले रणगाडेही मागे घेण्यात आले आहेत. चिनी सैनिक माघार घेतानाची छायाचित्रेही लष्कराने प्रसृत केली.