खरी कसोटी

0
102

पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याच्या ‘तपासा’ साठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येऊन गेले. आपल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकार्‍यांसमवेत त्यांनी घटनास्थळाला भेट वगैरे दिली आणि आजवरच्या तपासकामाबाबत चर्चाही केली. पाकिस्तानात परतल्यावर पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील तपासकामाला ते वेग देतील आणि लवकरच त्या कटाच्या सूत्रधारांना म्हणजे जैश ए महंमदच्या म्होरक्यांना गजांआड करतील अशी अपेक्षा बाळगणे भोळसटपणाचे ठरेल. मुंबई हल्ल्याच्या तपासाच्याच वाटेने पठाणकोट हल्ल्याचा तपास जाण्याची शक्यताच आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतात आपले तपास पथक पाठवले ही ऐतिहासिक घटना आहे, असे भाजपाचे नेते सांगत होते आणि त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी केलेल्या हातमिळवणीच्या प्रयत्नांना दिले जात होते. परंतु पाकिस्तानच्या एकूण पवित्र्यात काही फारसा बदल झालेला नाही हे कुलभूषण जाधव अटक प्रकरणात नुकतेच दिसून आलेले आहे. भारताच्या एनआयएला पाकिस्तानात तपास करू देणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतासंदर्भातील पाकिस्तानची नीती बदलल्याचे यत्किंचितही संकेत मिळत नाहीत. पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतात येऊन गेलेले पथक आता परतल्यावर भारताकडून आवश्यक ते सहकार्य मिळालेच नाही अशी कुरकूर करायला सुरूवात करू लागले आहे आणि सबळ पुरावेच नसल्याने पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांना दोषी कसे धरायचे असा आव आणतानाही दिसू लागले आहे. भारताच्या एनआयएने पाकिस्तानी जेआयटीला हवे ते पुरावे पुरवले नाहीत, कोणतेही नवे पुरावे दिले नाहीत, जे दिले ते विश्वासार्ह नाहीत, असा आव या जेआयटीच्या सदस्यांनी आणला आहे. म्हणजेच भारतात येऊन केलेले तपासकाम हा पाकिस्तानचा निव्वळ देखावा आहे. आपल्या भारतभेटीत पाकिस्तानी अधिकार्‍यांचा भर हा संशयास्पद वर्तन असलेल्या सलविंदरसिंग या माजी पोलीस अधिकार्‍याच्या चौकशीवर अधिक दिसला. पाकिस्तानचे तपासकामाचे इरादे खरोखर नेक असतील तर भारताला पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जे काही पुरावे पाकिस्तानकडून हवे आहेत, ते देण्याची तयारी त्यांनी दाखवणे आवश्यक आहे. पठाणकोटमध्ये मारल्या गेलेल्या चारही दहशतवाद्यांची ओळख भारतीय तपासयंत्रणेने पटवली आहे. नासीर हुसेन, हाफीज अबु बकर, अब्दुल कयाम आणि उमर फारूख अशी त्यांची नावे आहेत आणि ते अनुक्रमे वेहारी (पाकव्याप्त पंजाब), गुजरॉंवाला (पाकव्याप्त पंजाब), सुक्कूर (सिंध) आणि संघर (सिंध) या पाकिस्तानी गावांतील तरूण आहेत. यापैकी नासीरचे हल्ल्यावेळी त्याच्या आईशी संभाषण झाले होते, ती खय्याम बाबर हिच्या आवाजाचा नमुना पडताळून पाहणे भारतीय तपास यंत्रणेसाठी आवश्यक आहे. हल्ल्याचे सूत्रधार कशीफ जान आणि शाहिद लतीफ यांच्या आवाजांचे नमुने भारताला हवे आहेत. जैश ए महंमदचा म्होरक्या मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल असगर रौफ यांच्याही आवाजाचे नमुने भारताला हवे आहेत. हे सगळे आवाजाचे नमुने पाकिस्तान भारताला पुरवणार आहे का? जैशचा नेता मसूद अजहरला मध्यंतरी नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु ती निव्वळ धूळफेक ठरली. भारताने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तान्यांचा सहभाग कसा आहे याचे अनेकविध पुरावे सादर केलेले आहेत. दहशतवाद्यांचा मूळ ठावठिकाणा, त्यांच्या फोनवरील संभाषणाची ध्वनिमुद्रणे, त्यांच्याजवळ सापडलेली पाकिस्तानमध्ये बनवलेली औषधे, खाद्यपदार्थांची पाकिटे, कपडे, चपला, उपकरणे, शस्त्रास्त्रे हे सगळे सज्जड पुरावे असूनही पाकिस्तान मुंबई हल्ल्यासंदर्भात केले, त्याचीच पुनरावृत्ती करणार असेल तर उभय देशांतील मैत्रीच्या आणि गळाभेटीच्या नाटकांना अर्थ काय उरला? संवाद तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा परस्परांविषयी प्रगाढ विश्वास असतो. त्या विश्वासाला तडा गेला तर त्या संवादाला अर्थ तो काय उरेल? पाकिस्तानला भारताशी खरोखर सौहार्दपूर्ण संबंध आणि संवाद हवा असेल, तर पठाणकोट हल्ल्याचा तपास ही त्यासाठीची कसोटी असेल! मुंबई हल्ल्याच्या तपासकामात पाकिस्तानचा खरा चेहरा एकदा समोर आला. पठाणकोटच्या बाबतीत त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाकिस्तानसंदर्भातील भारताची नीती आता तरी थोडी कठोर बनेल काय?