वाहतूक नियम मोडणार्‍यांविरुद्ध पोलीस, वाहतूक खात्याची मोहीम

0
115

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक खाते व वाहतूक पोलिसांनी कालपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. मोक्याच्या जागी उभे राहून पोलीस दुचाकी वाहने अडवून हेल्मेट नसलेल्यांना चलन देत होते. वरील मोहीम दि. ३० पर्यंत चालू राहील, असे वाहतूक पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे.
वाहतूक खाते गेली अनेक वर्षे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे सांगत आहे. परंतु दुचाकीस्वार तसेच चार चाकी चालविणारे वाहने चालवित असताना राजरोसपणे मोबाईल ङ्गोनचा वापर करीत असतात. मात्र नियमांचे पालन करून वाहने चालविणार्‍यांना प्रचंड त्रास होतो. अलीकडे चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचे प्रकारही वाढले आहेत. सार्वजनिक सेवा देणार्‍या बसेसचे ड्रायव्हर, शर्यतीसाठी मोबाईल ङ्गोनचा वापर करताना दिसून येतात. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मालवाहू ट्रकांवरच अधिक लक्ष
वाहतूक पोलीस निष्काळजीपणे वाहने चालविणार्‍यांवर कारवाई न करता मालवाहू ट्रकांवरच ते अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे काल दिसून आले.
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे काय झाले?
वाहतूक खात्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्ष ही योजना सक्रिय पद्धतीने कार्यान्वित झाली नसल्याचे अधिकार्‍यांचेही म्हणणे आहे.

वास्कोत एकाच दिवशी एक लाखाचा दंड वसूल

वाहतूक नियम पालन व रस्ता सुरक्षा यासाठीच्या राज्यस्तरीय मोहिमेला काल वास्कोतही प्रारंभ झाला. वास्को वाहतूक पोलिसांनी या मोहिमेची अंमलबजावणी करताना वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहन चालकांकडून काल दिवसभरात (१११६ गुन्ह्यांखाली) १ लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. अपघातावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने हेल्मेट न वापरणार्‍यांवर तसेच विना परवाना, अल्पवयीन, दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर तसेच मोबाईल फोनवर वाहन चालवताना बोलणे या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची जोरदार मोहीम काल वास्कोतही अंमलात आणली.