खनिज महामंडळ स्थापन करण्याची भाजप आमदारांची मागणी ः लोबो

0
116

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राज्यात खनिज महामंडळाची स्थापना करण्याची मागणी भाजपच्या बहुसंख्य आमदारांनी आढावा बैठकीत केली असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

आल्तिनो पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्री, आमदारांच्या आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री लोबो यांनी वरील माहिती दिली.
राज्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. मागील २० महिने खनिज व्यवसाय बंद असल्याने खाण अवलंबितांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने खनिज महामंडळाची स्थापना करून पहिल्या टप्प्यात खनिज डंपचा लिलाव केल्यास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकतो. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यात खनिज महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. सावंत खनिज महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक आहेत, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.
सहकार, आदिवासी कल्याण मंत्री मंत्री गोविंद गावडे यांनी खनिज महामंडळ स्थापनेच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. आपण सुरुवातीपासून खनिज महामंडळ स्थापनेच्या बाजूने आहे, असेही मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील बंद असलेला खनिज व्यवसाय पुन्हा लवकर सुरू व्हावा म्हणून सर्व पर्यावरणीय विचार केला जात आहे. खनिज महामंडळ स्थापन करणे हा एक पर्याय आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या संबंधित प्रश्‍नावर बोलताना सांगितले.