केंद्रीय खाण सचिवांचे प्रतिपादन
गोव्यातून होणार्या लोहखनिज निर्यातीवर बंदीसंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे प्रतिपादन केंद्रीय अतिरिक्त खाण सचिव एस. के. श्रीवास्तव यांनी काल बंगलोरमध्ये केले. लोहखनिज व मँगनिजच्या बेकायदेशीर खाणींसंदर्भात चौकशी करणार्या न्या. एम. बी. शाह समितीने खनिज निर्यातीवर बंदीची शिफारस केलेली आहे. त्यासंदर्भात त्यांनी हे विधान केले.
चीनच्या माईनमेटल्स कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्याने भारतातील लोहखनिज निर्यातीवर सरकार निर्बंध आणू पाहात असल्याने पर्यायी बाजारपेठांकडे चीनने लक्ष वळवले आहे असे वक्तव्य केल्यासंदर्भात श्रीवास्तव यांचे यावेळी लक्ष वेधण्यात आले असता, भारताने त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. लोहखनिज निर्यातीसाठी भारत चांगली पर्यायी बाजारपेठ मिळवू शकतो, असे ते उद्गारले. शिवाय देशातील लोहखनिज वापरातही वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील खनिज पुरवठा स्थिर नसल्याचे चीनच्या माईनमेटल्स कॉर्पोरेशनचे सहायक प्रमुख प्रतिनिधी शी मिंग ली यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. चीनमध्ये भारताखेरीज ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण अमेरिकेतून खनिज आयात केली जाते. त्याशिवाय अलीकडे ते दक्षिण आफ्रिका, इराण, युक्रेन, कॉंगो, झिंबाब्वे, इंडोनेशिया व व्हेनेझुएलातूनही खनिज मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.