कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना अश्लील चित्रफीत पाहताना आढळलेल्या भाजपा सरकारमधील तिघाही मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे काल सादर केले. हे राजीनामे राज्यपाल भारद्वाज यांनी स्वीकारले आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याने समाधानी नसलेल्या विरोधी पक्षाने काल या विषयावरून जोरदार निदर्शने केली. या तिघाहीजणांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
कर्नाटकचे मंत्री सी. सी. पाटील, लक्ष्मण सवदी हे विधानसभेत मोबाईलवर चित्रफीत पाहताना आढळले होते. त्यांना ही चित्रफीत कृष्णा पालेमार या तिसर्या मंत्र्याने पुरवल्याचे उघड झाले होते. विधानसभा कामकाजाचे चित्रीकरण करणार्या टीव्ही कॅमेर्यात अश्लील चित्रफीत पाहताना मंत्री आढळल्याने त्यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष उसळला होता. त्यामुळे काल सकाळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे सादर केले. मात्र, त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यामुळे सभापती के. जी. बोपय्या यांनी एक सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत तिघांनाही विधानसभेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सभापतींनी तिघांनाही नोटिसा बजावल्या असून १३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास फर्मावले आहे. सभागृह समितीला अहवाल सादर करण्यास बारा मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.