कोविडविरुद्धच्या लढ्यात योग ठरला फायदेशीर

0
105

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आग्वाद किल्ल्यावर योगदिन साजरा

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट असून, कोरोनासारख्या महामारीच्या काळात असंख्य देशी-विदेशी नागरिकांना कोविडविरुद्ध लढण्यास योगाचा एका शस्त्रासारखा वापर करता आला, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल जागतिक योगदिनानिमित्त बोलताना काढले.

मुख्यमंत्र्यांनी जागतिक योगदिनानिमित्त आग्वादच्या किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात काल भाग घेतला. यावेळी त्यांनी जनतेला योगदिनाच्या शुभेच्छा देतानाच लोकांनी योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन केले. कोविड संकटाचा सामना करण्यासाठी कोट्यवधी लोक योगाकडे वळल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी देखील योगदिनानिमित्त म्हापसा येथे आयोजित शिबिरात भाग घेतला. यावेळी निरोगी जीवनासाठी लोकांनी नियमित योग करावा, असे आवाहन तानावडे यांनी केले.

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती उत्सवाला जोडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – योग एक भारतीय वारसा’ या अभियानातर्ंगत देशातील ७५ ठिकाणी जागतिक योगदिनाचे आयोजन केले होते. त्यात गोव्यातील आग्वाद किल्ला व तांबडी सुर्ल येथील महादेव मंदिर या स्थळांचा समावेश होता. ही दोन्ही स्थळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाअंतर्गत राष्ट्रीय महत्त्व असलेली संरक्षित स्मारके असल्याने त्यांची निवड करण्यात आली होती.