१० हजार पदे भरणारच : मुख्यमंत्री

0
107

>> विरोधकांकडून होणार्‍या टीकेनंतर घोषणेचा पुनरुच्चार

विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेली १० हजार पदे येत्या सहा महिन्यांत भरणे अशक्य नाही, हे आपण ही पदे तेवढ्या कालावधीत भरून सिद्ध करून दाखवणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. येत्या सहा महिन्यांत राज्य सरकार १० हजार पदे कशी काय भरणार, असा प्रश्‍न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे, त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.

गोवा क्रांती दिन सोहळ्यात राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तब्बल १० हजार सरकारी पदे भरणार असल्याची घोषणा केली होती. विविध सरकारी खात्यांत मिळून तब्बल १० हजार पदे रिक्त आहेत. ही पदे सरकार येत्या सहा महिन्यांत भरणार आहे. या १० हजार पदांमध्ये सरकारने पदे भरण्यासाठी जाहिरात दिलेल्या व अद्याप जाहिरात न दिलेल्या पदांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला भुलवण्यासाठी राज्य सरकारने ही घोषणा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत १० हजार पदे भरणे शक्य नसल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात आहे.

सरकारी नोकरभरतीबाबत विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत १० हजार पदे कशी भरणार हे विरोधकांना दाखवून देणार असल्याचे काल स्पष्ट केले.

दरम्यान, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शिक्षकांनी व्यवसाय मार्गदर्शन करावे, असे सुचवले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील प्रश्‍नावर बोलताना सांगितले.