कोविडमुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसीसचा धोका

0
40

>> राज्यात ६० रुग्णांवर उपचार सुरू?
>> बांबोळीतील गोमेकॉत स्वतंत्र वॉर्ड

राज्यात कोविड महामारीची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली असल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे. मात्र कोविड होऊन गेलेल्या राज्यातील रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असल्याचे दिसून येत आहे. राज्यात या घडीला किमान ६० रुग्ण या गंभीर आजारावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असल्याची चिंतादायक बाब समोर आली आहे. यापैकी कित्येक रुग्णांवर आपला एक किंवा दोन्ही डोळे गमावून बसण्याची पाळी येऊ शकते, अशी भीतीदायक माहितीही हाती आली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने प्रसारमाध्यमांसह कुणालाही कसलीच कुणकुण लागू न देता म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एका स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था केलेली आहे. १०२ क्रमांकाच्या या वॉर्डमध्ये या घडीला तब्बल ६० रुग्णांवर उपचार चालू आहेत. पैकी काही जणांची ह्या काळ्या बुरशीमुळे दृष्टी गेलेली असून या बुरशीचा संसर्ग त्यांच्या मेंदूला होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे डोळे काढून टाकण्याची पाळी येऊ शकते हे ऐकून या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तब्बल ६० रुग्ण सध्या १०२ वॉर्डमध्ये त्यांच्या नातेवाइकांसह भीतीच्या छायेत वावरत असून काही रुग्णांच्या नातेवाईकांनी भीतीपोटी स्वतः ह्या वॉर्डात राहण्यापेक्षा आपल्या नात्यातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पैसे घेऊन चाकरी करणार्‍या लोकांची मदत घेतली असल्याचे समजते.
राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर म्युकरमायकोसीस म्हणजेच काळ्या बुरशीचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळी गोमेकॉने वेळोवेळी म्युकरमायकोसीसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती प्रसारमाध्यमांना पुरवताना किती रुग्ण बरे झाले व किती रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत आदी माहिती दिली होती.

डॉक्टर्स व परिचारिकाही चिंतेत
गोमेकॉतील म्युकरमायकोसीसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील डॉक्टर्स व नर्सेसही तणावाखाली आहेत. मात्र, या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. म्युकरमायकोसीसचा संसर्ग मेंदूला झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता कमीच असते आणि त्यासाठीच बर्‍याच वेळा रुग्णांचे डोळेही काढावे लागतात. काही रुग्णांच्या दृष्टीवर यापूर्वीच गंभीर स्वरुपाचा परिणाम झाला असल्याचे वृत्त आहे.

सरकारचे आर्थिक मदतीसाठी आवाहन

कोविड महामारीच्या काळात मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी सरकारने योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत कोविड पीडितेच्या कुटुंबीयांना २ लाख रूपये एकरकमी आर्थिक साहाय्य दिले जाईल असे समाज कल्याण संचालनालयाने कळविले आहे. अर्जदाराने ज्या रुग्णालयात कोविड -१९ मुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या संबंधित रुग्णालयांद्वारे जारी केलेल्या विहित नमुन्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे आणि वैद्यकीय अहवालात आयसीएमआरच्या कोणत्याही अधिकृत प्रयोगशाळेच्या आरटीपीसीआर, आरएटी अहवालाचा संदर्भ असावा. या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करणार्‍या अर्जदारांना संबंधित रुग्णालयाकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्रास होत आहे असे आढळून आले आहे. त्यामुळे, कोविड मृत्यू प्रमाणपत्रासाठी आग्रह न धरता संबंधित अर्जदारांकडून अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण आरोग्य सेवा संचालनालयाकडून विभाग वैकल्पिकरित्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी करत आहे. याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

चोवीस तासांत कोरोनाने
राज्यात १०२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र बाधा झालेले १०२ रुग्ण सापडले. तसेच गेल्या चोवीस तासांत ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ९५० झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२९७ एवढी आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ५९४५ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५८ टक्क्यांवर घसरले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२ टक्के एवढा झाला आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या १३ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १५ एवढी आहे.
तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ८७ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७१,५४५ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७५,७९२ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १३,१३,९६५ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२२,८७६ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,३९७ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

मडगावात रुग्णांच्या
संख्येत पुन्हा वाढ

या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून तेथे आता रुग्णसंख्येने शंभरी पार केलेली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या १२४ एवढी आहे. त्या खालोखाल पणजीत ७७, पर्वरीत ६८, कांदोळी ५६, शिवोली ४७, कासावली ४२, फोंडा ४१, म्हापसा ३७, बाळ्ळी ३४, कुठ्ठाळी ३२ चिंबल २५, केपे २२, चिंचिणी २३ अशी रुग्णसंख्या आहे.