कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण १२ टक्के

0
51

>> राज्यात बुधवारी १३ मृत्यू

>> ४२८ जण कोरोनामुक्त

राज्यातील स्वॅबच्या तपासणीचे प्रमाण कमी झाल्याने नव्या रूग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. राज्यातील दरदिवशी कोरोना रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२ टक्के एवढे आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून नवे ३१० रुग्ण आढळले आहेत. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ४ हजार ०४४ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २,९६० झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११.९७ टक्क्यांवर आले आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात चोवीस तासांत १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ११ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात एका रुग्णाचा, उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे.

२४ तासांत ४२ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या ४२ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

४२८ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ४२८ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ३५४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २६८ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

चोवीस तासांत ३१० रुग्ण
चोवीस तासात कमी प्रमाणात स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. केवळ २५८८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३१० नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार ३५८ एवढी झाली आहे.
फोंडा येथे सर्वाधिक ४०२ सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २४९ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २३६ आणि चिंबलमधील रूग्णसंख्या २३३ एवढी आहे. कांदोळी येथे १२१ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १६८ रुग्ण, कासावली येथे १२२ रुग्ण, पर्वरी येथे १२५ रुग्ण, पेडणे येथे ११२ रुग्ण, साखळी १५३ रुग्ण, कुडचडे येथे १०० रुग्ण, काणकोण येथे १०६ रूग्ण आहेत.