राज्यात आतापर्यंत २१ इंच पाऊस

0
45

>> सरासरीपेक्षा ३४ टक्के जास्त प्रमाण

राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून रस्त्यावर पाणी साचणे, पडझडीच्या घटना घडत आहेत. राज्यात आत्तापर्यंत २१.०१ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३४ टक्के जास्त आहे. राज्यभरात चोवीस तासांत ४.०९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पेडणे येथे आतापर्यंत सर्वाधिक २९.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, म्हापसा येथे २३.६१ इंच पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत पेडणे येथे ५.९८ इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे ५.५४ इंच, ओल्ड गोवा येथे ५ इंच, वाळपई येथे ४.९१ इंच, सांगे येथे ४.८२ इंच, मुरगाव येथे ४ इंच, म्हापसा येथे ३.९७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी राजधानी पणजीसह पेडणे, वाळपई, ओल्ड गोवा, म्हापसा, मुरगाव या भागात जोरदार पाऊस पडला. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत वाळपई येथे ३.२४ इंच पावसाची नोंद झाली. याच वेळेत पेडणे येथे २.७३ इंच, पणजी येथे १.७५ इंच, ओल्ड गोवा येथे १.९१ इंच, मुरगाव येथे १.६७ इंच पावसाची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे रस्ते खराब झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर खड्‌ड्यांत पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्‌ड्यांचा अंदाज येत नाही. राज्यात येत्या १८ जूनपर्यत काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.