कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

0
67

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता

भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडेनऊ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील साडेनऊ कोटी शेतकर्‍यांना १९,००० कोटी रुपयांची रक्कम प्रदान केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी भारत पराभूत होणारे राष्ट्र नाही. भारत आणि कोणताही भारतीय धैर्य गमावणार नाही. आम्ही नक्कीच लढू आणि जिंकू असे म्हटले.

लस घेण्याचे आवाहन
देशभरातील शासकीय रुग्णालयांत मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा क्रमांक येईल तेव्हा लस नक्की घ्या. लस आपल्याला कोरोनापासून संरक्षण देते आणि गंभीर आजाराचा धोका कमी होतो. लस हे कोरोनाविरूद्ध संरक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशभरात जलद गतीने लसीकरण पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत देशभरात जवळपास १८ कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. आपण सगळ्यांनी आपल्या अनेक जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत.
गेल्या वर्षभरात देशवासीयांनी ज्या प्रकारचे दु:ख सहन केले त्याचा मलाही त्रास होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव हप्त्यांतर्गत साडेनऊ कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना १९,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपये जमा होतील. डिसेंबर २०१८ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणार्‍या शेतकर्‍यांना मिळतो.