येत्या १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी डोस ः जावडेकर

0
131

येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडून राज्यांना १.९२ कोटी लशींचे डोस देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. देशातील अनेक राज्यांनी कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी याबाबत सांगितले की, दि. १६ ते ३१ मे या पंधरा दिवसांदरम्यान राज्यांना १.९२ कोटी लशींचा पुरवठा करण्यात येणार आहे. ह्या लशी मोफत पुरवण्यात येणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.
देशातील कोरोना लशींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती नीती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये
२१६ कोटी लशी

येत्या ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत भारत आणि भारतीयांसाठी २१६ कोटी लशींचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही लस उपलब्ध होईल असा विश्‍वासही यावेळी डॉ. पॉल यांनी व्यक्त केला. भारतात आत्तापर्यंत १८ कोटी लशी दिल्याची माहिती यावेळी डॉ. पॉल यांनी दिली.