कोरोनामुक्त झालेल्यांनी३ महिन्यांनंतर लस घ्यावी

0
122

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना

कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्याच्या ३ महिन्यानंतर संबंधितांनी लस घ्यावी. तसेच ज्या स्तनदा माता असतील त्यांच्यासाठीही ही लस सुरक्षित असून त्यांनीही लस घ्यावी अशी सूचना कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने केली आहे.

कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यानंतर लशीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांनी घ्यावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल करत या सूचना केल्या आहेत. द नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेन फॉर कोविड-१९ कडून यासंदर्भात शिफारस करण्यात आली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी. त्या आधी लस घेणे टाळावे असे त्यांनी दिलेल्या नव्या शिफारशीत म्हटले आहे. ही शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.

स्तनदा माताही लस घेऊ शकतात. मात्र गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. तसेच ज्या रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे आणि इस्पितळामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ते ३ महिन्यांनी कोरोनावरील लस घेऊ शकतात. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांनी कोरोनामुक्त झाल्यावर ३ महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा.

कुणाला दुसरा गंभीर आजार असेल आणि इस्पितळात आयसीयूमध्ये दाखल झाला असेल त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी ४ ते ८ आठवड्यांनंतर करोनावरील लस घ्यावी. त्याचप्रमाणे कोरोनावरील लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.