कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करणार

0
159

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

राज्यातील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जारी करण्यात येणार आहेत. पर्वरीतील साल्वादोर द मुंद येथील एका निवासी इमारतीमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करून तेथे ठेवण्यात आलेल्या एका कॅसिनोमधील ३१ कर्मचार्‍यांना मडगाव येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिली.

आमदार खंवटे यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. पणजीतील एका कॅसिनाच्या ३१ कर्मचार्‍यांंना कोरोनाची लागण झाली असून त्यांना पर्वरीत एका इमारतीमध्ये ठेवल्याने स्थानिकांत भीती पसरली आहे. त्यामुळे त्या कोरोनाबाधितांना त्वरित अन्यत्र हलविण्याची गरज आहे, असे खंवटे यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, आमदार प्रतापसिंह राणे यांनी कोविड एसओपीचे कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच शिगमोत्सवासाठी एसओपीचे कडक पालन करण्याची गरज आहे. तसेच पर्वरीतील त्या ३१ रुग्णांना दक्षिण गोवा इस्पितळात हलविण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

बाबूश मोन्सेरात कोरोना पॉझिटिव्ह
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केलेली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या संदर्भात त्यांनी माहिती देताना आपण केलेली कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया त्वरित कोरोना चाचणी करावी असे आवाहन केले आहे.