कोरोनामुळे यंदा सरकारी शिगमोत्सव रद्द ः मुख्यमंत्री

0
159

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने सरकारी शिगमोत्सवाचे आयोजन करणे हे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आम्ही यंदा राज्यात सरकारी शिगमोम्सवाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य तासाच्या वेळी गोवा विधानसभेत दिली. मात्र, त्याचबरोबर गावागावात होणार्‍या धार्मिक व पारंपरिक शिगमोत्सवावर सरकारने बंदी घातलेली नाही. लोकांनी एसओपीचे पालन करून आपापल्या गावातील शिगमोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

काल गोवा विधानसभेत शून्य तासाला सुदिन ढवळीकर यांनी सरकारी शिगमोत्सवाच्या प्रश्‍नावरून पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना सरकारने सरकारी शिगमोत्सवाबाबत कोणता निर्णय घेतला आहे हे आम्हाला सांगावे, असा आग्रह धरला. त्यावेळी आजगावकर यांनी आम्ही त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र, यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारी शिगमोत्सवाबाबत विधानसभेतच काय ते सांगावे अशी मागणी केली. त्यानंतर सावंत यांनी यंदा सरकारी शिगमोत्सव आयोजित न करण्याचा निर्णय घतल्याचे स्पष्ट केले.

तत्पूर्वी ढवळीकर यांनी, सरकारने एक तर सगळीकडे शिगमोत्सवाचे आयोजन करावे अथवा तो रद्द करावा, अशी आजगावकर यांना सूचना केली होती. शिगमोत्सवानिमित्त चित्ररथ व रोमटामेळ करणार्‍यांनी त्यावर भरपूर पैसे खर्च केलेले आहेत. सरकारने त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली.

मुख्यमंत्री सावंत यांनी सरकारी शिगमोत्सव केला जाणार नसला तरी सर्व संबंधित कलाकारांना भरपाई देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.