कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पण मृत्यूसत्र सुरूच

0
56

>> रविवारी नवे ६४५ बाधित, २८ जणांचा बळी

राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजून जास्तच आहे. गेल्या चोवीस तासांत नव्या ६४५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आणखी २८ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २६२५ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ०१० झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर १९.९० टक्क्यावर आला आहे. राज्यातील आणखी १६६३ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात दीड महिन्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी आलेली आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून १२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५५ हजार ०६४ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत २८ बळी
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २८ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १७ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात ९ रुग्ण, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळ आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात प्रत्येकी एका रूग्णाचा बळी गेला असून यातील पाच रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता.

नवे ६४५ रुग्ण
चोवीस तासांत नवे ६४५ बाधित रुग्ण आढळून आले असून ३२४२ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील १९.९० टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १२८३ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६९४ रुग्ण आणि चिंबलमधील रूग्णसंख्या ५५३ एवढी आहे. फोंडा ८५५, कांदोळी ६९९, कुठ्ठाळी ५०३, कासावली ५७३, वास्को ३७१, पर्वरी ५८४, पेडणे ५५६, शिवोली ४४४, कुडचडे ५२८, खोर्ली ४२९, लोटली ४०६ तर म्हापशात ४०७ रुग्ण आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत नव्या ९९ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

१२०६ जण कोरोनामुक्त
काल कोरोनाबाधित आणखी १६६३ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार ४२९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली असून ते प्रमाण ८९.२७ टक्के एवढे झाले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ५४६ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.