कॉंग्रेस २५ जागा जिंकेल : ऍड. खलप

0
127

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला २५ जागा मिळू शकतात, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. रमाकांत खलप यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांचा गोवा दौरा पार पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

प्रत्येक पक्षात हेवेदावे हे असतातच, असे सांगून पक्षातील ज्या ज्या नेत्यांचे जे म्हणणे होते, ते पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी ऐकून घेतले असल्याचे ऍड. खलप म्हणाले.

पक्षातील ज्येष्ठ नेते व युवा नेते यांची मते वेगळी असू शकतात; पण प्रत्येक एका पक्षात ज्येष्ठ नेते व युवा नेते असतात. समतोल राखण्यासाठी ज्येष्ठ व युवा अशा दोन्ही वयोगटातील नेत्यांची पक्षाला गरज असते, हे विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले. दहा फुटीर आमदारांविषयी तुमचे म्हणणे काय असे विचारले असता, ते आपल्या फायद्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये गेलेले असून, ते तेथे सुखी असावेत असे आपणाला वाटत असल्याचे नर्मविनोदी शैलीत बोलताना ऍड. खलप म्हणाले. आगामी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास मी अनुत्सूक आहे, असे मी म्हणणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.